बारामतीच्या शेतकऱ्याचा विषय खोल ! ‘या’ जातीच्या उसापासून मिळवले एकरी 140 टन विक्रमी उत्पादन, माजी कृषिमंत्र्यांनाही पडली भुरळ, वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Baramati Successful Farmer : पुणे जिल्ह्यातील बारामती हा परिसर शेतीमध्ये केल्या जाणाऱ्या नवनवीन प्रयोगासाठी विशेष ओळखला जातो. बारामतीने देशाला शेती क्षेत्रातील वेगवेगळ्या तंत्रज्ञानाची भेट दिली आहे. येथील शेतकरी कायमचा आपल्या नवनवीन प्रयोगासाठी चर्चेत राहतात. येथील शेतकऱ्यांनी नवनवीन प्रयोगाच्या माध्यमातून चांगली कमाई देखील केली आहे.

तालुक्यातील सोनकसवाडी येथील शेतकरी एडवोकेट संजय जगताप यांनी देखील शेतीमध्ये योग्य नियोजन, जिद्द आणि कष्टाच्या जोरावर लाखो रुपयांची कमाई केली आहे. खरे तर जगताप हे व्यवसायाने वकील आहेत. पुण्यात जगताप वकिली करतात. मात्र वकिली सोबतच त्यांनी शेतीची आवड देखील जोपासली आहे.

लहानपणापासूनच शेतीची आवड असल्याने वकिली व्यवसायासोबतच ते शेतीचा देखील व्यवसाय करत आहेत. दरम्यान जगताप यांनी निष्णांत कायदेतज्ञ असतानाही उसाच्या शेतीत अभूतपूर्व कामगिरी करून दाखवली आहे. जगताप यांनी ऊस लागवडीतून एकरी तब्बल 138 टन एवढे विक्रमी उत्पादन मिळवले आहे. यामुळे निष्णांत कायदे तज्ञ अशी ओळख प्राप्त असलेल्या जगताप यांची ओळख प्रयोगशील शेतकरी अशी बनली आहे.

सध्या जगताप यांची संपूर्ण राज्यभर चर्चा पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे जगताप यांच्या या कामाची भारताचे माजी कृषिमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना देखील भुरळ पडली आहे. पवारांनी त्यांच्या बांधावर हजेरी लावत त्यांच्या या कामाचे कौतुक केले आहे. तसेच पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे जगताप यांचा आनंद द्विगुणीत झाला आहे.

कसं केल नियोजन

माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे सभासद, निष्णांत वकील संजय जगताप यांनी त्यांच्या या यशाचे गुपित उलगडले आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे, त्यांच्या शेतात उसाच्या आधी केळीचे पिक लावण्यात आले होते. केळी पिकातून उत्पादन मिळवल्यानंतर त्यांनी उसाची लागवड करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी सात फूट अंतरावर सऱ्या पाडल्या.

मग त्यांनी सांगली जिल्ह्यातील आष्टा येथून उसाच्या को 86032 या जातींचे उसाचे बेणे मागवले. मग त्यांनी दीड फूट अंतरावर जवळपास 4200 रोपांची लागवड केली. ऊस लागवड केल्यानंतर तज्ज्ञांच्या सल्ल्याने रासायनिक खतांचा वापर केला.

विद्राव्य खतांसाठी आणि पाण्यासाठी ठिबक सिंचन प्रणालीचा वापर करण्यात आला. त्यामुळे त्यांच्या पिकाची वाढ चांगली झाली. ऊस दहा ते बारा आणि 20 ते 22 कांड्यांचा झाल्यावर त्यांनी त्यांचे पाचट काढून टाकले. परिणामी उसाची चांगली वाढ झाली आणि त्यांचा ऊस 40 ते 50 कांड्यांचा तयार झाला.

माळेगाव कारखान्याचे ऊस विकास अधिकारी सुरेश काळे आणि कारखान्याचे कार्यकारी संचालक अशोक पाटील यांचा त्यांच्या या यशात मोठा वाटा आहे. या लोकांनी त्यांना उसाचे विक्रमी उत्पादन मिळवण्यासाठी वेळोवेळी अनमोल मार्गदर्शन केले आहे. या लोकांनी त्यांना विशेष सहकार्य केले आहे.

किती कमाई झाली

माळेगाव सहकारी साखर कारखान्याने उसाला 3411 रुपये एवढा दर दिला आहे. जगताप यांनी सांगितल्याप्रमाणे, 138 टन उसाच्या मोबदल्यात त्यांना चार लाख 83 हजार रुपये उत्पन्न मिळाले आहे. तसेच खर्च वजा जाता साडेतीन लाख रुपयांची कमाई झाली आहे.

एकंदरीत वकिली पेशा सांभाळत जगताप यांनी केलेली ही कामगिरी तरुण शेतकरी वर्गाला मोठी प्रेरणादायी ठरणार आहे. यामुळे इतरही प्रयोगशील शेतकरी जगताप यांच्याप्रमाणे विविध प्रयोगातून शेतीमधून चांगली कमाई करतील असा आशावाद व्यक्त केला जात आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा