Banking News : भारतात गेल्या काही वर्षांमध्ये पैशांचे व्यवहार डिजिटल पद्धतीने होऊ लागले आहेत. ऑनलाइन पेमेंट करण्याला आता विशेष महत्त्व दिले जात आहे. यासाठी यूपीआय पेमेंटचा वापर होत आहे.
यूपीआय पेमेंटसाठी बाजारात वेगवेगळ्या एप्लीकेशन देखील उपलब्ध झाले आहेत. पेटीएम, फोन पे, गुगल पे यांसारख्या एप्लीकेशनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात डिजिटल पेमेंट केले जात आहे.
तथापि, आजही भारतात असे अनेक लोक आहेत जे कॅशने पेमेंट करण्यास प्राधान्य देतात. काही लोक कंप्यूटर फ्रेंडली नसल्यामुळे कॅशने पेमेंट करणेच त्यांना सुरक्षित वाटते. तसेच काही लोकांना ऑनलाइन पेमेंट रिस्की वाटते.
सायबर ठगीचे प्रमाण वाढत असल्याने काही लोकांना ऑनलाइन पेमेंट रिस्की वाटू लागली आहे. यामुळे आजही पैशांच्या व्यवहारासाठी कॅशचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. तुम्हीही शंभर, दोनशे, पाचशेच्या नोटा कुठं ना कुठं वापरल्याच असतील.
मग, जर 100, 200, 500 च्या नोटांवर काही लिहिलेले असेल तर ती नोट चालत नाही का ? असा सवाल तुम्हाला पडला आहे का ? कारण की, अनेक दुकानदार जर नोटांवर काही लिहिलेले असेल, नोटांवर चिरखडलेले असेल तर अशा नोटा घेण्यास नकार देतात.
यामुळे खरंच आरबीआयने नोटांवर जर पेनाने काही लिहिलेले असेल तर अशा नोटा अवैध ठरवल्या आहेत का हा मोठा सवाल सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान आज आपण आरबीआयने याविषयी काय नियम तयार केलेले आहेत हे थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
आरबीआयच्या नोटांच्या नियमांनुसार, रिझर्व्ह बँक लोकांना नोटांवर काहीही लिहू नये असे आवाहन करते. यामुळे नोटेची वैधता संपणार नाही, परंतु तिचे आयुष्य कमी होते. बँकेने म्हटले की चलनावर पेन वापरल्याने त्याचे आयुष्य कमी होते.
‘क्लीन नोट पॉलिसी’च्या माध्यमातून लोकांना नोटांवर काहीही लिहू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. याद्वारे तुम्ही तुमच्या देशाच्या चलनाचे आयुष्यच कमी करत आहात. अर्थातच जर नोटांवर एखाद्याने काही लिहिलेले असेल तर ती नोट वैध राहणार आहे म्हणजे चालणार आहे.
मात्र यामुळे त्या नोटचे आयुष्य कमी होते. परिणामी भारताचे सुजाण नागरिक म्हणून कोणीच 100, 200, 500 च्या नोटांवर पेनाने लिहू नये असे आवाहन RBI ने केले आहे.