Banking News : आरबीआय ही भारत सरकारने 1935 मध्ये स्थापित केलेली देशातील बँकिंग नियामक संस्था आहे. या संस्थेचे देशभरातील बँकांवर लक्ष असते. देशातील सर्वच खाजगी, सहकारी आणि सरकारी बँकांना आरबीआयच्या नियमांचे पालन करावे लागते.
ज्या बँका नियमांचे पालन करत नाहीत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे अधिकार या संस्थेला आहेत. आरबीआयकडून नियमांचे उल्लंघन केलेल्या बँकांवर दंडात्मक कारवाई केली जाते. एवढेच नाही तर काही बँकांचे लायसन्स देखील रद्द केले जाते.
अर्थातच बँकेचे लायसन रद्द करण्याचा अधिकार देखील आरबीआयला देण्यात आला आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून आरबीआयच्या माध्यमातून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बँकांवर कारवाईचा धडाका सुरू आहे.
यात काही बँकांचे लायसन्स रद्द करण्यात आले आहे तर काही बँकांवर दंडात्मक कारवाई देखील करण्यात आली आहे. अशातच आता आरबीआयने देशातील चार बँकांवर कठोर कारवाई केली आहे.
यामध्ये आपल्या महाराष्ट्रातील एका बँकेचा समावेश आहे. नियमांचे उल्लंघन केल्यामुळे या सदर बँकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. परिणामी सदर बँकेतील ठेवीदारांमध्ये मोठे भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे.
मात्र नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी ही कारवाई झाली असून यामुळे ग्राहकांवर कोणताच विपरीत परिणाम होणार नाही असे जाणकार लोकांनी स्पष्ट केले आहे.
कोण-कोणत्या बँकेला ठोठावला दंड
मिळालेल्या माहितीनुसार 8 फेब्रुवारी 2024 रोजी आरबीआयने देशातील चार सहकारी बँकांवर लाखो रुपयांचा दंड ठोठावला आहे. नियमांचे उल्लंघन केल्याने ही दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
याबाबत आरबीआयने एक परिपत्रक जारी केले आहे. यामध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार, नकोदर हिंदू अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, पारसी को-ऑपरेटिव्ह बँक, बॉम्बे मर्केंटाईल को-ऑपरेटिव्ह बँक आणि द नवनिर्माण को-ऑपरेटिव्ह बँकेवर लाखो रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
RBI ने म्हटल्याप्रमाणे, बॉम्बे मर्केंटाईल सहकारी बँकेवर 63.30 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. जोरास्ट्रियन सहकारी बँकेवर 43.40 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. नकोदर हिंदू अर्बन सहकारी बँकेला 6 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
द नवनिर्माण सहकारी बँकेवर 1 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. मात्र या कारवाईचा बँकेच्या ग्राहकांवर कोणताच विपरीत परिणाम होणार नाही असे देखील आरबीआयने आपल्या निवेदनात म्हटले आहे.