Ativrushti Nuksan Bharpai : यावर्षी अतिवृष्टीमुळे राज्यातील बहुतांशी शेतकरी बांधवांच्या (Farmer) शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषता मराठवाडा आणि विदर्भात अतिवृष्टीचा तडाखा अधिक पाहायला मिळाला आहे. अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात सर्वाधिक नुकसान झाले.
राज्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकरी बांधवांसाठी मायबाप शासनाने (State Government) 3501 कोटी रुपयांची मदत यापूर्वीच जाहीर केली आहे. या मदतीचे वाटप देखील सुरू आहे. दरम्यान सततच्या पावसामुळे (Heavy Rain) देखील राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे नुकसान (Crop Damage) झाले होते.
मात्र निकषात बसत नसल्यामुळे अशा शेतकऱ्यांना 3501 कोटी रुपयांची मदत जाहीर झाली त्याचा लाभ मिळाला नाही. अशा परिस्थितीत निकषात न बसलेल्या शेतकऱ्यांकडून देखील नुकसान भरपाईची मागणी केली जात होती. शेतकऱ्यांच्या या मागणीकडे शासनाने गांभीर्याने लक्ष घातले असून जे शेतकरी बांधव नुकसान भरपाईच्या निकषात बसत नाही त्यांच्यासाठी विशेष बाब म्हणून निधी जाहीर करण्यात आला आहे.
मराठवाड्यातील (Marathwada) निकषात न बसणाऱ्या परंतु वास्तविक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी 597 कोटी 54 लाख तीन हजार रुपयांची मदत जाहीर केली गेली आहे. यासंदर्भात 13 ऑक्टोबर रोजी महत्त्वाचा शासन निर्णय देखील निर्गमित झाला आहे. म्हणजेच आता मराठवाड्यात सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या मात्र निकषात न बसणाऱ्या शेतकरी बांधवांना लवकरच मदत मिळणार आहे.
या शासन निर्णयान्वये आता सततच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जिरायती पिकाच्या नुकसानीसाठी 13600 रुपये प्रति हेक्टर तसेच बागायती पिकांच्या नुकसानीसाठी 27 हजार रुपये प्रति हेक्टर, तर बहुवार्षिक पिकाच्या नुकसानीसाठी 36 हजार रुपये प्रति हेक्टर मदत दिली जाणार आहे. सदर मदत ही तीन हेक्टरच्या मर्यादित राहणार असल्याचे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.
एकंदरीत मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, परभणी, हिंगोली आणि उस्मानाबाद या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना 597 कोटी 54 लाख तीन हजार रुपयांची मदत शासनाकडून जाहीर झाली असून येत्या काही दिवसात संबंधित शेतकरी बांधवांच्या खात्यात ही रक्कम वर्ग केली जाणार आहे.