Maize Farming : भारतीय हवामान खात्याने आणि हवामान तज्ञांनी येत्या मान्सून काळात महाराष्ट्रात चांगला पाऊस बरसणार असा अंदाज व्यक्त केला आहे. हवामान तज्ज्ञांनी यावर्षी मान्सूनचे वेळे आधीच आगमन होऊ शकते असे म्हटले आहे.
यामुळे यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळणार अशी आशा आहे. खरीप हंगामात नेहमीप्रमाणेच यंदाही सोयाबीन , कापूस, मका यांसारख्या पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड होणार आहे. दरम्यान जर तुम्हीही यंदा खरीप हंगामात मक्याची पेरणी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजचा हा लेख खूपच कामाचा ठरणार आहे.
खरे तर महाराष्ट्रात रब्बी हंगामापेक्षा खरीप हंगामात मक्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. मका खरीप, रब्बी आणि उन्हाळी अशा तीनही हंगामामध्ये उत्पादित होणारे पिक आहे.
या पिकाची राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात लागवड केली जाते. मात्र या पिकातून जर चांगले विक्रमी उत्पादन मिळवायचे असेल तर याच्या सुधारित वाणांची लागवड करणे गरजेचे आहे. दरम्यान आता आपण मका पिकाच्या सुधारित जातींची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
पावसाळी हंगामात लागवडीसाठी उपयुक्त मक्याच्या सुधारित जाती
पुसा संकरित मका १ : पावसाळी हंगामात या जातीच्या मक्याची लागवड केल्यास शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळते. मक्याचा हा वाण लवकर हार्वेस्टिंग साठी तयार होतो. 70 ते 80 दिवसात या जातीपासून उत्पादन मिळते. या जातीपासून हेक्टरी 40 ते 50 क्विंटल उत्पादन मिळत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
विवेक संकरित मका २१ : या जातीची देखील पावसाळ्यात लागवड केली जाऊ शकते. 70 ते 80 दिवसात या जातीचे पीक परिपक्व होते आणि या जातीपासून 45 ते 50 क्विंटल प्रति हेक्टर एवढे उत्पादन मिळत असल्याचा दावा तज्ञांनी केलेला आहे.
विवेक संकरित मका २७ : हा देखील मक्याचा एक लवकर हार्वेस्टिंग साठी तयार होणारा वाण आहे. या जातीचे पीक 80 ते 90 दिवसात हार्वेस्टिंग साठी तयार होते आणि हेक्टरी 50 ते 55 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळते.
महाराजा : या जातीचा मका देखील लवकर हार्वेस्टिंग साठी तयार होतो. या जातीचे पीक सरासरी 80 ते 90 दिवसात हार्वेस्टिंग साठी तयार होते आणि हेक्टरी 60 ते 65 क्विंटल एवढे दर्जेदार उत्पादन मिळते.
राजर्षी : मक्याचा हा मध्यम कालावधीत हार्वेस्टिंग साठी तयार होणारा वाण आहे. या जातीचे पीक सरासरी 90 ते 100 दिवसात परिपक्व होते आणि या जातीपासून हेक्टरी ७० ते ७५ क्विंटल एवढे दर्जेदार उत्पादन मिळते.
फुले महर्षी : या जातीचे पीक देखील 90 ते 100 दिवसात काढण्यासाठी तयार होते आणि एका हेक्टर जमिनीतून 75 ते 80 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळत असल्याचा दावा तज्ञांनी केला आहे.
बायो-९६३७ : मक्याची ही देखील जात मध्यम कालावधीत हार्वेस्टिंग साठी तयार होणारी आहे. या जातीपासून शेतकऱ्यांना हेक्टरी 70 ते 75 क्विंटल एवढे उत्पादन मिळते. पीक परीपक्व कालावधी हा 90 ते 100 दिवसांचा. महाराष्ट्रात लागवडीसाठी उपयुक्त असा हा वाण आहे.