Apple Farming In North Maharashtra : सफरचंद म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभे राहत ते हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरचे थंड हवामानाचे दृश्य. या भागातील थंड हवामान सफरचंद शेतीला खूपच मानवते. मात्र अलीकडे सफरचंदाची लागवड इतरही मैदानी भागात मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे.
प्रायोगिक तत्त्वावर का होईना पण इतर मैदानी भागात सफरचंद लागवड केली जात आहे. विशेष म्हणजे प्रायोगिक तत्त्वावर होत असलेली ही लागवड यशस्वी होत असल्याने शेतकऱ्यांचा आत्मविश्वास उंचावत आहे.
दरम्यान असंच एक उदाहरण समोर आल आहे ते उत्तर महाराष्ट्रातून. उत्तर महाराष्ट्रातील उष्ण आणि काहीसे दमट हवामान सफरचंद पिकाला मानवणार नाही हे माहिती असतानाही नासिक जिल्ह्यातील एका प्रयोगशील शेतकऱ्याने सफरचंद लागवडीचा निर्णय घेतला आणि सफरचंदाची लागवड या अवलियाने यशस्वी देखील करून दाखवली आहे.
नासिक जिल्हा हा द्राक्ष, कांदा, डाळिंब या पिकांसाठी विशेष ओळखला जातो. जिल्ह्यातील निफाड तालुका हा द्राक्ष आगार म्हणून संपूर्ण राज्यात ख्यातनाम आहे. मात्र तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना नैसर्गिक संकटांचा मोठा फटका बसत आहे.
अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, गारपीट यांसारख्या नानाविध संकटांमुळे द्राक्ष उत्पादकांना द्राक्ष शेती मधून अपेक्षित अशी कमाई होत नाहीये.
यामुळे काहीतरी हटके प्रयोग करायचा या अनुषंगाने निफाड तालुक्यातील पालखेड येथील शेतकरी भरत बोलीज यांनी हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमध्ये उत्पादित होणाऱ्या सफरचंदाची यशस्वी शेती करून दाखवली आहे.
भरत यांनी लागवड केलेल्या सफरचंदांना आता फळ लागली आहेत. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील सफरचंद लागवडीचा हा प्रयोग यशस्वी झाला असल्याचे बोलले जात असे. खरेतर भरत सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथे प्राध्यापक म्हणून एका महाविद्यालयात नोकरी करत होते.
परंतु कोरोनाच्या काळात त्यांच्या नोकरीवर गदा आला. त्यामुळे आता करायचे काय हा मोठा प्रश्न त्यांच्यापुढे उपस्थित झाला.मात्र, भरत यांनी नोकरी गेल्यानंतर न खचता गावाकडे शेती सुरू केली. शेतीमध्ये नवीन प्रयोग म्हणून त्यांनी हिमालयीन शिमला ऍना या जातीच्या सफरचंदाची लागवड केली आहे.
या जातीच्या सफरचंदाची 30 रोपांची त्यांनी मार्च 2023 मध्ये लागवड केली. या रोपांसाठी त्यांना तीन हजार रुपयांचा खर्च आला आहे. दरम्यान, त्यांनी लागवड केलेल्या रोपांना आता फळे लगडली आहेत.
विशेष म्हणजे एप्रिल-मे 2024 मध्ये फळे हार्वेस्टिंग साठी तयार होणार आहेत. दरम्यान सफरचंद लागवडीचा हा प्रयोग आता यशस्वी झाला असल्याने भरत आगामी काळात सफरचंदाच्या आणखी काही रोपांची लागवड करणार आहेत.