Apple Farming In Maharashtra : महाराष्ट्रातील शेतकरी बांधव नेहमीच वेगवेगळे प्रयोग करत असतात. शेतीतल्या नवख्या प्रयोगाच्या जोरावर राज्यातील शेतकरी लाखोंची कमाई करत आहेत. दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील शेतकरी देखील आता शेतीमध्ये काळाच्या ओघात बदल करून पारंपारिक पिकांऐवजी नवीन नगदी पिकांची, औषधी पिकांची, फळपिकांची शेती करू लागले आहेत.
विशेष म्हणजे आता मराठवाड्यातील रखरखत्या वातावरणात जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेश सारख्या थंड वातावरणात उत्पादित होणाऱ्या सफरचंदाच्या पिकाची देखील शेती होऊ लागली आहे. सफरचंद पिकाला थंड हवामान मानवते हे प्रत्येकाला ठाऊक आहे.
पण मराठवाड्यातील बीड जिल्ह्याच्या शेतकऱ्याने योग्य नियोजनाच्या बळावर मराठवाड्यासारख्या उष्ण प्रदेशात सफरचंद शेती यशस्वी केली आहे. गेवराई तालुक्याच्या मिरकाळा येथील पोपट ढाकणे यांनी ही किमया साधली आहे.
पोपटरावांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी तीन वर्षांपूर्वी पारंपारिक पिकांना फाटा देऊन शेतीत काहीतरी नवीन बदल करायचा असे ठरवले. त्यांनी शेतात सफरचंद लागवडीचा निर्णय घेतला.
खरेतर राज्यात सोलापूर, अहमदनगर, नासिक येथे काही प्रयोगशील शेतकऱ्यांनी प्रायोगिक तत्त्वावर सफरचंद शेती यशस्वी करून दाखवलेली आहे. त्यामुळे ढाकणे यांनी आपणही असा प्रयोग करायचा असे ठरवले.
यासाठी त्यांनी हिमाचल प्रदेश मधून सफरचंदाची रोपे मागवली. त्यांनी हिमाचल प्रदेश मधून 200 रोपे मागवली आणि त्यांचे प्लांटेशन केले. आता या झाडांना तीन वर्षांचा काळ पूर्ण झाला असून या सफरचंद झाडांना मोठ्या प्रमाणात फळे लागली आहेत.
एका झाडाला 40 ते 50 फळे लागली असून एका फळाचे वजन ऍव्हरेज 100 g असल्याचे त्यांनी सांगितले आहे. या बहरातील फळे आता में ते जून पर्यंत बाजारात विक्रीसाठी येणार आहेत. या दोनशे झाडांमधून त्यांना जवळपास दीड टन उत्पादन मिळणार अशी आशा आहे.
वास्तविक, ढाकणे यांना सुरुवातीला त्यांच्याकडील उष्ण हवामान सफरचंदासाठी अनुकूल ठरणार का आणि या मातीत सफरचंद पीक येणार का याबाबत शंका होती.
मात्र योग्य नियोजनामुळे आणि ढाकणे यांच्या प्रामाणिक कष्टांमुळे आज तीन वर्षांनी या सफरचंद झाडांना मोठ्या प्रमाणात फळे लागली असून आता त्यांना चांगले उत्पन्न मिळणार आहे.
यामुळे ढाकणे यांच्या चेहऱ्यावर कमालीचे समाधान पाहायला मिळत आहे. मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा आपण घेतलेला धाडसी निर्णय आज खरा ठरला यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर अधिक समाधान दिसत होते. दरम्यान, पंचक्रोशीत ढाकणे यांच्या धाडसी प्रयोगाची विशेष चर्चा पाहायला मिळत आहे.