सध्या रासायनिक खतांच्या वाढत्या दुष्परिणामांमुळे सेंद्रिय शेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढवण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे.तर सेंद्रिय शेतीचे क्षेत्र वाढण्यासाठी सरकार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 50 हजार रुपये मदत देणार आहे.
सेंद्रिय शेतीसाठी दोन वेगवेगळ्या योजना राबवल्या जाणार असून उत्पादन वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या साधनसामुग्रीसाठी प्रोत्साहनही दिले जाणार आहे. दिवसेंदिवस रासायनिक खतांचा उत्पादन वाढीसाठी अतिरिक्त वापर होत असल्यामुळे मानवी आरोग्य धोक्यात आले आहे.
सेंद्रिय शेतीकडे शेतकऱ्यांनी वळणे गरजेचे आहे. त्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करीत आसून सेंद्रिय शेतीसाठी दोन योजना राबविल्या जाणार आहेत.असे केंद्रीय कृषी कल्याण राज्यमंत्री कैलाश चौधरी यांनी लोकसभेत बोलताना सांगितले आहे. यामध्ये पारंपरिक कृषी योजनात आणि ईशान्य भागातील शेतकऱ्यांसाठी मिशन ऑर्गेनिक व्हॅल्यू चेन डेव्हलपमेंट या योजनांचा समावेश आहे.
2015-16 पासून शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून या दोन योजना सुरु करण्यात आल्या आहेत. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पीक पेरणी करण्यापासून ते कापणी आणि पाण्याचे योग्य व्यवस्थापन कसे करावे हे विषय असणार आहेत. त्यात सेंद्रिय शेती वाढवण्यावर सरकारचा जास्त भर राहणार आहे. त्यासाठी सरकार एक हेक्टरी 3 वर्षांकरिता 50 हजार रुपये देणार आहे.
त्याचबरोबर मिशन ऑर्गेनिक व्हॅल्यू चेन डेव्हलपमेंट या योजने अंतर्गत शेतकरी उत्पादक कंपन्याचे कोणतेही कर्ज, दर्जेदार बियाणे, प्रक्रिया आणि इतर कामांसाठी हेक्टरी 46 हजार 575 रुपये प्रति हेक्टर 3 वर्षांसाठी मिळणार आहे. सेंद्रिय शेती वाढत गेल्यास सरकारचा सेंद्रिय शेती उत्पादनाची निर्यात करण्याचा देखील सरकारचा प्रयत्न राहणार आहे. सध्या इंडिया ऑर्गन हे ब्रॅंड सध्या जगात लोकप्रिय ठरत आहे.
2013 साली सेंद्रीय शेतीच्या माध्यमातून 1 लाख 77 हजार टन शेतीमालाचे उत्पादन झाले होते.तर यंदा ते 8 लाख 8 हजारावर पोहचले आहे. त्यामुळे भविष्यातील सेंद्रिय शेतीचे महत्त्व आणि वाढती मागणी लक्षात घेता शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळणे आता गरजेचे आहे. त्यात सरकार नवनवीन योजना आणून सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत आहे. या योजनेचा शेतकऱ्यांना लाभ करून घेणे गरजेचे आहे.