Anandacha Shidha Maharashtra News : महाराष्ट्र राज्य शासनाने गेल्या महिन्यात 22 ऑगस्ट 2023 रोजी एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला. राज्य शासनाने गेल्या दिवाळीत तसेच गुढीपाडवा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती दिन आनंदाचा शिधा वितरित केला होता. याच पार्श्वभूमीवर आता यंदाच्या गौरी गणपतीच्या सणाला आणि दिवाळीच्या सणाला आनंदाचा शिधा वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे.
या संदर्भात 22 ऑगस्टला राज्याच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या वतीने शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. राज्यातील अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना हा आनंदाचा शिधा मिळणार आहे. यामध्ये रवा, चणाडाळ, साखर हे प्रत्येकी एक किलो आणि एक लिटर खाद्यतेल हे जिन्नस वाटप केले जाणार आहे. विशेष म्हणजे हे सर्व जिन्नस लाभार्थ्यांना केवळ शंभर रुपये वितरित होणार आहे.
यामुळे गौरी गणपतीचा आणि दिवाळीचा यंदाचा सण देखील गोड होणार अशी आशा नागरिकांना आहे. मात्र गेल्यावेळी अर्थातच गुढीपाडव्याच्या सणाला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त वाटप करण्यात आलेला आनंदाचा शिधा वेळेत लाभार्थ्यांना पोहोचला नाही. यामुळे सण उलटून मिळालेला लाभ नागरिकांना फायद्याचा ठरला नाही. मात्र यावेळी तरी हा शिधा वेळेत लाभार्थ्यांना मिळेल अशी भोळीभाबडी आशा सामान्य जनतेची आहे.
दरम्यान या शिधा वितरणाबाबत एक महत्त्वाचे अपडेट हाती आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गौरी गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर वितरित होणारा हा शिधा सहा सप्टेंबर पासून लाभार्थ्यांना मिळणार आहे.
नागपूर जिल्ह्याचा विचार केला असता जिल्ह्यातील आठ लाख लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर हा शिधा जिल्ह्यात पोहोचण्यास सुरुवात झाली असून बुधवारपासून म्हणजेच 6 सप्टेंबर पासून याचे वितरण सुरू होणार अशी माहिती समोर आली आहे.
कसे होणार वितरण?
मिळालेल्या माहितीनुसार, गौरी गणपतीच्या सणाला आणि दिवाळीच्या सणाला असे दोनदा या शिध्याचे वाटप होणार आहे. तसेच ई-पॉस मशिनद्वारे या लाभाचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती पुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे. हा शिधा गौरी-गणपतीसाठी 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या काळात आणि दिवाळीसाठी 15 ऑक्टोबर ते 12 नोव्हेंबर या काळात लाभार्थ्यांना वितरित केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.