Ajit Pawar :- विदर्भ, मराठवाड्यासह राज्यातील अतिवृष्टीग्रस्त विभागात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सोमवारी (ता.२५) केली. अतिवृष्टीग्रस्तांना राज्य आपत्ती निवारणाचे (एसडीआरएफ) निकष बाजूला ठेवून आघाडी सरकारप्रमाणे अडीचपट, तिप्पट मदत देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली.
राज्यात जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जनता अडचणीत आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांने केलेल्या पेरण्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. काही ठिकाणी पावसाने जमिनी वाहून गेल्या असून घराचीही मोठया प्रमाणावर पडझड झाली आहे.
स्थावर मालमत्तेचेही मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. सततच्या पावसामुळे पंचनामे अजूनपर्यंत होऊ शकले नाहीत. त्यामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना लोकप्रतिनिधींच्या चर्चेतून आणि नुकसानीसंदर्भांत शासनाच्या धोरणाची योग्य ती दिशा समजून शेतकऱ्यांना तात्काळ मदत व्हावी म्हणून राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलवावे, अशी मागणी पवार यांनी केली.
अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी केली. राज्यात गेल्या दोन वर्षात अतिवृष्टी झाली.
तौक्ते, निसर्ग सारखी चक्रीवादळ येऊन गेली. त्यावेळी आघाडी सरकारने निकष बाजूला सारून शेतकऱ्यांना मदत केली. त्यामुळे आताही सरकारने शेतकऱ्यांना बी बियाणे, रोपांची मदत करून शेतकऱ्याला आपत्तीतून बाहेर काढावे, असे अजित पवार म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमच्या सरकारमध्ये काम केले आहे. तरीही आघाडी सरकारच्या काळातील विकास कामांना आता स्थगिती देण्याचे काम सुरु आहे. दोघांना असे वाटतय की आपणच सरकार चालवतोय. हे दोघ काही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेले नाहीत.
राज्य मंत्रिमंडळळाचा विस्तार न होणे हा जनतेचा अपमान आहे. तुमच्याकडे बहुमत आहे मग विस्तार का करत नाही? लोकशाहीत असे वागून चालत नाही.सरकारमध्ये पालकमंत्रिपदाची जबाबदारी महत्वाची असते. पालकमंत्री आपत्तीच्या ठिकाणी जाऊन आढावा घेतात आणि यंत्रणेला कामाला लावतात, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
राज्य चालवून दाखवा ?
आमच्यात भूकंप होणार नाही. ज्यांनी भूकंप केला त्यांनी आता राज्य ताब्यात घेतले आहे. आता राज्य चालवून दाखवा. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत दोघांच्या हातात काही नाही. जोपर्यंत दिल्लीतून हिरवा कंदील मिळत नाही, तोपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होईल असे वाटत नाही, असे पवार म्हणाले.