अहमदनगरच्या शेतकऱ्याला लाल सोन्याने बनवले मालामाल; 45 दिवसातच मिळवले 40 लाखांचे उत्पन्न ! संपूर्ण महाराष्ट्रात एकच चर्चा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar Farmer Success Story : कधीकाळी लाल चिखल म्हणून ओळखले जाणारे टोमॅटो आता शेतकऱ्यांसाठी लाल सोने ठरले आहे. आपल्याकडे विक्रमी भावामुळे केशरला लाल सोने म्हणून ओळखतात. पण गेल्या दोन महिन्यांपासून टोमॅटोला चांगला विक्रमी भाव मिळत असल्याने हे पीक शेतकऱ्यांसाठी सोन्यापेक्षा कमी राहिलेले नाही. या पिकाने राज्यातील अनेक शेतकऱ्यांना लखपती आणि करोडपती बनवली आहे.

गेल्यावर्षी अनेक भागातील टोमॅटो उत्पादकांनी टोमॅटोला चांगला भाव मिळाला नसल्याने टोमॅटो अक्षरशः रस्त्यावर फेकले होते. उन्हाळ्यात टोमॅटोचे भाव खूपच कमी होते. पण गेल्या दोन महिन्यांपासून टोमॅटोला कधी नव्हे तो विक्रमी दर मिळत आहे. याचा परिणाम म्हणून राज्यातील बहुतांश शेतकरी मालामाल झाले आहेत. यामुळे टोमॅटो उत्पादकांच्या माध्यमातून समाधान व्यक्त केले जात आहे.

तसेच जर शेतमालाला योग्य भाव मिळाला तर शेतकऱ्यांना कोणाकडे झोळी पसरवण्याची वेळ येणार नाही हे यावरून पुन्हा एकदा सिद्ध होत आहे. दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यातील नगर तालुक्याच्या भातोडी येथील एका शेतकरी कुटुंबाला टोमॅटोच्या पिकाने मात्र दीड महिन्यात 40 लाख रुपयांचे उत्पन्न मिळवून दिले आहे. 45 दिवसात 40 लाखांचे उत्पन्न मिळवणाऱ्या या शेतकरी कुटुंबाची सध्या संपूर्ण नगर तालुक्यात चर्चा पाहायला मिळत आहे.

भातोडी येथील बबन धलपे यांनी ही किमया साधली आहे. त्यांनी टोमॅटो लागवडीतून लाखों रुपयांची कमाई केली आहे. खरंतर धलपे कुटुंब गेल्या दहा वर्षांपासून टोमॅटोची शेती फुलवत आहेत. भाव कसाही मिळो मात्र टोमॅटोचे पीक ते दरवर्षी घेतात. याच त्यांच्या सातत्याचे आज त्यांना फळ मिळाले आहे. बबन यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडे आठ एकर जमीन आहे.

यामध्ये ते विविध पिकांची शेती करतात. दरम्यान, यावर्षी एप्रिल महिन्यात त्यांनी टोमॅटो लागवड केली होती. आठ एकर जमिनी पैकी दीड एकर जमिनीवर टोमॅटोची लागवड करण्यात आली. खरंतर उन्हाळ्यात टोमॅटोला खूपच कमी दर मिळत होता तरी देखील त्यांनी टोमॅटो लागवड करण्याचा निर्णय घेतला. एप्रिल महिन्यात लागवड केलेल्या या टोमॅटोतुन त्यांना जुलै महिन्यापासून उत्पादन मिळू लागले आहे.

ज्यावेळी त्यांनी टोमॅटोचा पहिला थोडा काढला त्यावेळी त्यांना 80 रुपये प्रति किलो असा विक्रमी दर मिळाला. यानंतर भावात आणखी वाढ झाली आणि बाजारभाव शंभर रुपयांच्या घरात गेले. विशेष म्हणजे मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या बाजारात याहीपेक्षा अधिक दर मिळत होता. या विक्रमी बाजारभावामुळे बबन यांना अवघ्या दीड महिन्यात 40 लाखांचे उत्पन्न ते ही दीड एकर जमिनीतून मिळाले आहे.

यामुळे सध्या धलपे कुटुंब आनंदी असून मेहनतीचे आज खऱ्या अर्थाने फळ मिळाले असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. बबन सांगतात की, टोमॅटो लागवड करण्यासाठी, औषध, खत यासाठी आणि तारेचे कुंपण करण्यासाठी त्यांना दोन ते अडीच लाखांचा खर्च आला आहे. एकंदरीत दोन ते अडीच लाख रुपये खर्च करून बबन यांना चाळीस लाखांची कमाई झाली आहे. निश्चितच बबन यांनी टोमॅटो शेतीत सातत्य जोपासल्याने याचा त्यांना मोठा फायदा झाला आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा