Agriculture News : देशातील शेतकरी हंगाम आणि महिन्यानुसार त्यांच्या शेतात वेगवेगळी पिके घेतात, जेणेकरून त्यांना त्यांच्या शेतीतून वेळेत चांगले उत्पन्न मिळू शकेल. मात्र, गेल्या काही वर्षांपासून पारंपारिक पिकांच्या लागवडीतून शेतकऱ्यांना अपेक्षित असे उत्पन्न मिळत नसल्याची वास्तविकता नाकारून चालणार नाही.
हेच कारण आहे की, आता शेतकरी बांधव तरकारी पिकांच्या शेतीकडे वळू लागले आहेत. भाजीपाला, वेलीवर्गीय फळपिके अशा हंगामी पिकांच्या शेतीतून शेतकऱ्यांना चांगली कमाई होऊ लागली आहे.कमी दिवसांच्या कालावधीत शेतकऱ्यांना अधिकचे उत्पन्न या पिकातून मिळत आहे.
अशा परिस्थितीत आज आपण आपल्या शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची माहिती घेऊन हजर झालो आहोत. आज आपण फेब्रुवारी महिन्यात कोणत्या भाजीपाल्याची लागवड केली जाऊ शकते याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.
फेब्रुवारीत लागवड करता येणारी भाजीपाला पिके?
कारले : शेतकरी बांधव फेब्रुवारी महिन्यात कारल्याची लागवड करू शकतात. कारल्याची लागवड ही जवळपास सर्व प्रकारच्या जमिनीत होत असते.
मात्र जर शेतकऱ्यांना कारल्याच्या पिकातून चांगले दर्जेदार उत्पादन मिळवायचे असेल तर शेतकऱ्यांनी पाण्याचा योग्य निचरा होत असलेल्या जमिनीत कारल्याची लागवड करावी असा सल्ला दिला जातोय.
मिरची : मिरचीची लागवड खरीप आणि रब्बी हंगामात केली जाते. अनेक शेतकरी बांधव फेब्रुवारीमध्ये ही मिरचीची लागवड करत असतात.
जर तुम्हाला उन्हाळी हंगामात मिरचीची लागवड करायची असेल तर तुम्ही जानेवारी ते फेब्रुवारी या कालावधीत मिरचीची लागवड केली पाहिजे. कृषी तज्ञांनी उन्हाळी हंगामातील मिरचीच्या पिकातून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळत असल्याचा दावा केला आहे.
दुधी भोपळा : डोंगराळ अन मैदानी भागात सहजपणे दुधी भोपळ्याची लागवड केली जाऊ शकते. याच्या लागवडीसाठी उष्ण व दमट हवामान आवश्यक असते. याचे बियाणे शेतात पेरण्यापूर्वी २४ तास पाण्यात भिजत ठेवावे. हे बियाणे उगवण प्रक्रियेला गती देते. या प्रक्रियेनंतर बियाणे शेतात पेरण्यासाठी तयार होते.
भेंडी : भेंडीची लागवड जानेवारी ते एप्रिल या कालावधीत केली जाऊ शकते. याशिवाय भेंडीची शेती ही जून ते जुलै आणि ऑक्टोबर ते नोव्हेंबर या कालावधीतही केली जाते.
जर तुम्ही फेब्रुवारीमध्ये भेंडी लागवड करत असाल तर हा काळ लागवडीसाठी सर्वोत्कृष्ट ठरू शकतो. कारण की उन्हाळ्यात भेंडीला चांगली मागणी राहू शकते. तथापि, पाण्याची शाश्वत उपलब्धता असेल तेव्हाच याची लागवड करावी.