Agriculture News : राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजची बातमी खूपच खास राहणार आहे. कारण की आज आपण भोगवटदार वर्ग 2 च्या जमिनी भोगवटदार वर्ग एक मध्ये रूपांतरित करण्यासाठीच्या संपूर्ण प्रक्रियेची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. खरंतर अनेक शेतकऱ्यांच्या माध्यमातून भोगवटदार वर्ग दोन च्या जमिनी वर्ग 1 मध्ये करण्यासाठी कुठे अर्ज करावा लागतो, यासाठी कोण-कोणते कागदपत्रे सादर करावे लागतात तसेच यासाठी किती नजराणा भरावा लागतो असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. दरम्यान आज आपण या साऱ्या प्रश्नांची उत्तरे अगदी सोप्या भाषेत समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
भोगवटदार वर्ग 2 आणि वर्ग 1 जमिनीतला फरक
जवळपास प्रत्येकच शेतकऱ्याला या विषयी माहिती आहे. परंतु ज्यांना या विषयी माहिती नसेल त्यांच्यासाठी आम्ही सांगू इच्छितो की भोगवटदार वर्ग 2 या अशा जमिनी असतात ज्या शासनाकडून मिळालेले असतात. म्हणजेच या जमिनींचे मालक शासनाच असते. अशा जमिनी संबंधित खातेधारकाला विकता येत नाही.
देवस्थानाला गेलेल्या इनामी जमिनी आणि भूमिहीन लोकांना वाटण्यात आलेल्या शेत जमिनी या भोगवटदार वर्ग दोन मध्ये येतात. अशा जमिनी सरकारी अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय हस्तांतरित करता येत नाहीत. दुसरीकडे भोगवटदार वर्ग एक ही अशी जमीन असते जी खातेधारकाची मालकीची असते. अशी जमीन संबंधित खातेदार विकू शकतो. यासाठी त्याला कोणाचीच परवानगी घ्यावी लागत नाही.
भोगवटदार वर्ग 2 जमीन वर्ग 1 मध्ये करण्यासाठी अर्ज कुठे करायचा
मिळालेल्या माहितीनुसार यासाठी तहसील कार्यालयात जाऊन माननीय तहसीलदार महोदय यांच्याकडे विहित अर्जात अर्ज सादर करावा लागतो. विहित अर्ज काळजीपूर्वक भरून सादर झाल्यानंतर आणि आवश्यक ती कागदपत्रे सादर केल्यानंतर भोगवटदार वर्ग दोन जमिनीचे वर्ग एक मध्ये रूपांतरण होते.
नजराणा किती भरावा लागतो
भोगटदार वर्ग 2 मधील जमिनी वर्ग 1 मध्ये करण्यासाठी नजराणा द्यावा लागतो. मात्र आता खंडकरी शेतकऱ्यांच्या वर्ग दोन मधील जमिन वर्ग एक करताना नजराणा लागणार नाही. मात्र इतर भूमीहीनांना दिलेल्या जमिनी वर्ग एक मध्ये रूपांतरित करताना नजराणा द्यावा लागणार आहे.
शेती वापरासाठी आणि वाणिज्य वापरासाठी जमीन दिलेली असेल तर अशा जमिनीचे रूपांतरण करण्यासाठी चालू वर्षातील बाजारभावाच्या 50 टक्के एवढी रक्कम नजराना म्हणून द्यावी लागते. रहिवासी वापरासाठी कर्ज हक्काने धारण केलेली जमीन असेल तर चालू वर्षातील बाजारभावाच्या 15 टक्के एवढी रक्कम नजराना म्हणून द्यावी लागते.
मात्र रहिवाशी वापरासाठीच परंतु भाडेपट्टाने धारण केलेली जमीन असेल तर चालू वर्षातील बाजारभावाच्या 25% एवढी रक्कम नजराना म्हणून द्यावी लागणार आहे. विशेष म्हणजे 2019 नंतर ज्या नागरिकांनी या जमिनीचे रूपांतरण केले आहे त्यांना नजराणा भरता यावा यासाठी 7 मार्च 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे.
कोणकोणती कागदपत्र सादर करावी लागतात
भोगवटदार वर्ग दोन जमीन वर्ग एक मध्ये रूपांतरित करण्यासाठी संबंधितांना काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. यात संबंधित जमिनीचे गेल्या 50 वर्षांतील सातबारा उतारे, या सातबारा उताऱ्यावरील सर्व फेरफार नोंदी, चतु:सीमा दाखवणारा नकाशा, आकरबंदाची मूळ प्रत, एकत्रीकरणाचा मूळ उतारा, मूळ धारकास जमीन कशी मिळाली त्याबाबत कबुलायत, तलाठी यांच्याकडील वन जमीन नोंद वहीचा उतारा अशा इतरही अन्य काही महत्त्वाच्या कागदपत्रांचा समावेश होतो.
अर्ज केल्यानंतर पुढील प्रक्रिया कशी असते
भोगवटदार वर्ग दोन जमिनी वर्ग एक मध्ये रूपांतरित करण्यासाठी अर्ज सादर झाल्यानंतर संबंधित अर्जदारास किती नजराना भरावा लागेल याबाबतचा चलन दिलं जातं. चलन दिल्यानंतर मग हे चलन अर्जदाराला बँकेत जाऊन भरावा लागत. यानंतर मग या जमिनीची गाव नमुना सहा मध्ये नोंद केली जाते.
तलाठी यांच्या माध्यमातून गाव नमुना सहा मध्ये नोंद होते. एकदा की गाव नमुना सहा मध्ये याची नोंद झाली की मग पुढे मंडळ अधिकारी यांच्या माध्यमातून सर्व कागदपत्रांची शहानिशा केली जाते आणि भोगवटदार वर्ग दोन हा शेरा कमी करून भोगवटदार वर्ग एक हा शेरा चढवला जातो.