Agriculture News : शेतीमधून जर चांगले दर्जेदार उत्पादन मिळवायचे असेल तर शेतजमीन दर्जेदार असणे आवश्यक आहे. जमिनीचा पोत चांगला राहिला तरच चांगले उत्पादन मिळते, नाहीतर उत्पादनात मोठी घट येण्याची भीती असते. विशेषतः क्षारपड जमिनीत पिकातून चांगले उत्पादन मिळत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून सातत्याने होत असते.
खरंतर महाराष्ट्रात काळ्या जमिनीचे प्रमाण जास्त आहे. मात्र काळी कसदार जमीन खूपच जलद गतीने क्षारपड होऊ लागली आहे. कृषी तज्ञांच्या मते महाराष्ट्राची नैसर्गिक परिस्थिती यासाठी कारणीभूत आहेत.
राज्याची नैसर्गिक परिस्थितीच अशी आहे की काळी कसदार जमीन आता वेगाने क्षारपड, चोपण किंवा पाणथळ होऊ लागली आहे. एकंदरीत जमिनीचा पोत कमी होत चालला आहे. यामुळे अशा जमिनीतून शेतकऱ्यांना पाहिजे तेवढे उत्पन्न मिळत नाही.
दरम्यान कृषी तज्ञांनी क्षारपड होत चाललेल्या जमिनीवर कोणते पीक घेतले पाहिजे जेणेकरून शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळेल याबाबत अतिशय महत्त्वाची माहिती दिली आहे.
कृषी तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार क्षारपड किंवा चोपण जमिनीत पिकांची फेरपालट केली पाहिजे. तसेच फेरपालट करताना नेहमीच एकदल, द्विदल, नगदी पिके आणि हिरवळीच्या पिकांची लागवड केली पाहिजे.
अशा क्षारपड जमिनीत शेतकरी बांधव उडीद, तूर, हरभरा, मूग, वाटाणा, तीळ गहू, बाजरी, मका, भात, मोहरी, करडई, सोयाबीन, एरंडी, सूर्यफूल, जवस, ऊस, कापूस, भात व ज्वारी यांसारख्या अन्नधान्य पिकांची देखील शेती करू शकतात.
मात्र कोणत्याही पिकाची लागवड केली तरीदेखील शेतकऱ्यांनी पिकाची फेरपालट करणे आवश्यक आहे. तसेच अशा जमिनीत चवळी, मुळा, श्रावण घेवडा कांदा, बटाटा, कोबी, टोमॅटो, गाजर, पालक, शुगरबीट अशा भाजीपाला पिकांची देखील शेती केली जाऊ शकते.
आंबा, लिंबूवर्गीय फळझाडे चिकू, पेरू, डाळिंब, अंजीर, द्राक्षे नारळ, बोर, खजूर, आवळा अशा फळवर्गीय पिकांची देखील लागवड केली जाऊ शकते.
साग, सिरस, चिंच लिंबू, बाभूळ विलायती बाभूळ, सुरू, सिसम, निलगिरी अशा वन पिकांची किंवा झाडांचे देखील अशा जमिनीत लागवड केल्यास शेतकऱ्यांना चांगली कमाई होऊ शकते.
तसेच ब्ल्यू पॅनिक, पांढरे व तांबडे क्लोव्हर पॅरागवत, जायंट गवत, सुदान गवत, लसूणघास, बरसिम होडस गवत, बरमुडा गवत, करनाल गवत यांसारख्या चारा पिकांची देखील क्षारपड किंवा चोपण जमिनीत शेती करता येणे शक्य आहे.