Agriculture News : गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमधील शेतकरी बांधव अडचणीत आले आहेत. शेतकऱ्यांना एक ना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. म्हणायला आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे. मात्र याच कृषी प्रधान देशात सरकारचे काही धोरण हे शेतकरी विरोधी असून शेतकऱ्यांसाठी शासन उदासीन असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जातो.
सरकारच्या धोरणावरून शेतकरी, शेतकरी नेत्यांच्या माध्यमातून अनेकदा आवाज बुलंद करण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या काही मागण्यांसाठी सातत्याने शासनाकडे पाठपुरावा देखील सुरू आहे.
दरम्यान, अशीच शेतकऱ्यांची एक महत्त्वाची मागणी येत्या काही दिवसात पूर्ण होणार अशी आशा व्यक्त होऊ लागली आहे. यामुळे ही देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी आहे.
मिळालेल्या माहितीनुसार येत्या काही महिन्यांनी देशातील शेतकऱ्यांना स्वस्तात खते खरेदी करता येणार आहेत. आम्ही आपणास सांगू इच्छितो की कृषी प्रधान देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आपल्या भारतात शेतीमधील आवश्यक अशा घटकावर अर्थातच खतांवर जीएसटी लागू आहे.
रासायनिक खतांवर जीएसटी लागू असल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च हा खूपच वाढला आहे. रासायनिक खतांवर पाच टक्के आणि रासायनिक खत तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालावर 18% एवढा जीएसटी आकारला जात आहे.
पण, जर सरकारने हा जीएसटी माफ केला तर याचा थेट फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. कारण की जीएसटी माफ झाल्यानंतर शेतकऱ्यांना स्वस्तात खते मिळणार आहेत.
अखिल भारतीय कृषी निविष्ठा विक्रेत्यांची संघटनेने सांगितल्याप्रमाणे पुढील जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत याबाबतचा निर्णय होण्याची दाट शक्यता आहे.
ऑगस्ट 2024 मध्ये पुढील जीएसटी परिषदेची बैठक आयोजित केली जाणार आहे. या बैठकीत यावर चर्चा होऊन रासायनिक खतांवरील जीएसटी माफ करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.
रासायनिक खते जीएसटीमुक्त झाले पाहिजेत या मागणीचा गांभीर्याने विचार करावा म्हणून मंत्र्यांच्या अधिकृत समितीला म्हणजे जीओएमला या संघटनेच्या माध्यमातून शिफारस पाठवण्यात आली आहे.
जर संघटनेने पाठवलेली ही शिफारस मान्य झाली तर ऑगस्ट महिन्यात होऊ घातलेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत यावर सकारात्मक निर्णय होईल आणि रासायनिक खतांना जीएसटी मधून सूट असा विश्वास या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून व्यक्त केला जात आहे.