Agriculture News : शेतकरी बांधव शेतीमध्ये कायमचं नवनवीन प्रयोग करत असतात. या नवनवीन प्रयोगाच्या माध्यमातून शेतकरी बांधव उत्पादन वाढवतात. यातील काही प्रयोग शेतकऱ्यांच्या हिताचे ठरतात तर काही प्रयोग शेतकऱ्यांच्या अंगलट देखील येतात. अशातच मध्यप्रदेश राज्यातील शेतकऱ्यांचा एक अफलातून प्रयोग समोर आला आहे. एका मीडिया रिपोर्ट मधून समोर आलेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेश राज्यातील नर्मदापुरम जिल्ह्यातील काही भागात पिकाचे उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांनी एक भन्नाट प्रयोग केला आहे.
या प्रयोगाला भन्नाट म्हणण्याऐवजी झिंगाट म्हटले तर अति उत्तम ठरणार आहे. कारण की, येथील शेतकऱ्यांनी पिकाचे उत्पादन वाढावे यासाठी चक्क देशी दारूची फवारणी केली आहे. विशेष बाब म्हणजे येथील शेतकरी देशी दारूची फवारणी केल्याने पिकाचे उत्पादन वाढते असा दावा करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आपले शेजारील राज्य मध्य प्रदेश येथील नर्मदापुरम जिल्ह्यातील चंदौन, संखेडा आणि जामनी या गावातील काही शेतकऱ्यांनी मूग पिकाच्या चांगल्या वाढीसाठी आणि दर्जेदार उत्पादनासाठी देशी दारू फवारणीचा एक वेगळाच प्रयोग केला आहे.
यामुळे सध्या या शेतकऱ्यांची संपूर्ण देशभरात चर्चा रंगली आहे. मध्यप्रदेश राज्यात या शेतकऱ्यांची विशेष चर्चा पाहायला मिळत आहे. खरतर, देशी दारूची फवारणी केल्यास पिकांचे उत्पादन वाढेल अशी भोळी भाबडी अशा या शेतकऱ्यांना आहे. शेतकऱ्यांना मूग पिकावर अल्कोहोलची फवारणी करून उत्पादन वाढवायचे आहे. या शेतकऱ्यांना देशी दारू फवारल्याने पिकाचे उत्पादन वाढेल असा ठाम विश्वास आहे.
देशी दारू फवारल्यामुळे पिकात उष्णता वाढते आणि यामुळे फुलधारणा होण्यास मदत होते असे एक वैज्ञानिक कारण यामागे असावे असे मत काही लोकांकडून व्यक्त होत आहे. मात्र याचा कोणताच वैज्ञानिक पुरावा नाही. याविषयी कोणतेच शोध संशोधन झालेले नाही. वास्तविक या शेतकऱ्यांचा हा झिंगाट प्रयोग समोर आल्यानंतर देशी दारू फवारल्याने खरंच पिकाच्या उत्पादनात वाढ होते का? हा प्रश्न अनेकांना पडला आहे.
अनेकांना याबाबत जाणून घेण्याची उत्सुकता आहे. अशा परिस्थितीत आज आपण पिकावर जर देशी दारूची फवारणी केली तर उत्पादनात खरंच वाढ होते का? यामागे काही वैज्ञानिक पुरावे आहेत का? कृषी तज्ञांचे यावर काय मत आहे याविषयी अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
काय म्हणताय कृषीतज्ञ
मध्यप्रदेश मधील शेतकऱ्यांनी पिकावर देशी दारू फवारण्याचा प्रयोग केला आहे. तसेच या प्रयोगामुळे पिकाच्या उत्पादनात वाढ होणार असा दावा त्यांनी केला आहे. याबाबत मात्र कृषी तज्ञांशी विचारणा केली असता कृषी तज्ञांनी हा दावा फेटाळून लावला आहे. कृषी तज्ञांनी हा प्रयोग निरर्थक असून यामुळे पिकास कोणताच फरक पडणार नसून याउलट पीक धोक्यात येऊ शकते, असे मत यावेळी व्यक्त केले आहे.
कृषी तज्ञांच्या मते, शेतकरी बांधवांनी पिकाचे उत्पादन वाढवण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या टॉनिकचा, औषधांचा, खतांचा वापर केला पाहिजे. तसेच जर पिकावर किडींचा आणि रोगाचा प्रादुर्भाव असेल तर तज्ञांच्या सल्ल्याने कीटकनाशकांचा आणि बुरशीनाशकांचा वापर केला पाहिजे. मात्र दारू फवारण्याचा प्रयोग साफ निरर्थक असून दारू फवारल्यामुळे पिकावर कोणताच परिणाम होत नाही असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. तसेच काही तज्ञांनी दारू फवारणीचा हा प्रयोग शेतकऱ्यांच्या अंगलट येऊ शकतो आणि यामुळे त्यांचे नुकसान होऊ शकते असा दावा केला आहे.