Agriculture News : शेतजमीनीवरून शेतकऱ्यांची ओळख ही पटत असते. आणि 7/12 उताऱ्यावरून शेतजमीन ही नेमकी कोणाच्या मालकीची आहे हे आपल्याला समजत असतं. अशा परिस्थितीत जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार करताना सातबारा हा एक महत्त्वाचा दस्तऐवज बनतो. जाणकार लोक जमिनीची खरेदी करताना नेहमीच त्या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावरील नोंदी काळजीपूर्वक वाचण्याचा सल्ला देखील देत असतात.
आता तुम्ही म्हणत असाल जमीन खरेदी करताना सातबारा उताऱ्यावरील नोंदी काळजीपूर्वक का वाचाव्यात? तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की राज्य शासनाने काही जमिनींचे व्यवहार कायद्याने प्रतिबंधित केले आहेत किंवा शासनाची पूर्वपरवानगी घेऊन काही जमिनीचे व्यवहार हे होत असतात. अशा परिस्थितीत ज्या जमिनीच्या खरेदीसाठी शासनाची पूर्वपरवानगी आवश्यक असते अशा जमिनीची खरेदी जर पूर्व परवानगी विना झाली तर ती खरेदी देखील अमान्य ठरवली जाऊ शकते.
आता तुम्ही म्हणाल कोणत्या जमिनीची खरेदी शासनाच्या पूर्व परवानगीशिवाय करता येत नाही? हे कसं ओळखायचं. तर याची सविस्तर माहिती संबंधित जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर असते. मात्र अनेकदा सातबारा उताऱ्यावर असलेल्या नोंदी आपल्याला समजण्यात अडचण निर्माण होते. अशा परिस्थितीत आज आपण सातबारा उताऱ्यावर असलेल्या काही महत्त्वाच्या नोंदी नेमकं काय सांगतात, याचा अर्थ काय होतो, कोणत्या जमिनी हे या शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय खरेदी विक्री केल्या जातात आणि कोणत्या जमिनी ह्या शासनाच्या पूर्वपरवानगी घेऊन खरेदी विक्री कराव्या लागतात याविषयी जाणून घेणार आहोत.
जसं की आपणास ठाऊकच आहे जमिनीचे व्यवहार करताना सातबारा उतारा आणि आठ अ चा उतारा महत्त्वाचा असतो. आपण सातबारा उताऱ्यामध्ये भोगवटादार किंवा जुनी शर्त, नवी शर्त किंवा वर्ग एक, वर्ग दोन तसेच भोगवटदार वर्ग 1 आणि भोगवटदार वर्ग 2 असे शब्द पाहतो. नेमका या शब्दांचा अर्थ काय होतो? जमिनी खरेदी करताना या शब्दावरून जमिनीच्या मालकीची माहिती कशी समजते? हे जाणून घेऊया.
जुनी शर्तीची जमीन, वर्ग 1 जमीन किंवा भोगवटदार वर्ग 1 म्हणजे काय?
सर्वप्रथम सातबारा उताऱ्यावर असलेल्या जुनी शर्तीची जमीन वर्ग 1 जमीन किंवा भोगवटदार वर्ग 1 म्हणजे काय याविषयी आता आपण जाणून घेऊया. ज्या सातबारा उताऱ्यावर जुनी शर्तीची जमीन वर्ग 1 जमीन किंवा भोगवटदार वर्ग 1 असा उल्लेख असतो असा सातबारा धारक शेतकरी त्या जमिनीचा मूळ मालक असतो. अशा उताऱ्यावर खा असा उल्लेख आपल्याला आवर्जून पाहायला मिळेल. म्हणजेच ही जमीन खाजगी मालकीची असते आणि या जमिनीचा खरेदी विक्रीचा व्यवहारावर त्या संबंधित सातबारा धारक शेतकऱ्याव्यतिरिक्त कुणाचेही नियंत्रण नसते. शासणाच्या पूर्वपरवानगीशिवाय अशी जमीन विक्री केली जाऊ शकते.
नवीन शर्तीची जमीन, वर्ग 2 जमीन किंवा भोगवटादार वर्ग 2 म्हणजे काय रे भाऊ ?
सातबारा उताऱ्यावर जर असा उल्लेख असेल तर या जमिनीचा खरेदी विक्रीचा व्यवहार करताना शासनाची पूर्वपरवानगी आवश्यक असते. या जमिनी प्रामुख्याने इनामी जमिनी असतात. यामुळे खरेदी विक्रीपूर्वी शासनाचे पूर्वपरवानगी आवश्यक असते. तहसीलदार किंवा त्यापेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी या जमिनीच्या व्यवहारासाठी आवश्यक असते. अशी परवानगी घेतली नाही तर सदर व्यवहार रद्दबातल देखील होत असतो. अशा जमिनी विक्री करताना भोगवटदार जमीन धारकाला मिळणाऱ्या रकमेतून ठराविक रक्कम शासन तिजोरीत जमा होत असते.
शासकीय पट्टेदार म्हणजे काय रे भाऊ
ज्या शेतकऱ्यांना ठराविक कालावधीसाठी शासनाकडून वहिवाट्यासाठी भाडेतत्त्वावर जमीन मिळत असते अशा सातबारा धारक शेतकऱ्यांना शासकीय पट्टेदार म्हणतात.