Agriculture News : शेतात, पिकात विनाकारण उगणारे गाजर गवत पिकांसाठी मोठे घातक ठरते. या गवतामुळे पीक उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येते. अशा परिस्थितीत, गाजर गवतावर नियंत्रण कसे मिळवायचे हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जातो. परंतु जर गाजर गवतापासून खत बनवले गेले आणि हे खत पिकाला दिले तर ज्या गवतामुळे पीक उत्पादनात घट येते त्या गवताचे हे खत पीक उत्पादनात वाढ घडवून आणणार आहे.
गाजर गवत ज्याला महाराष्ट्रातील काही भागात काँग्रेस गवत म्हणून ओळखले जाते. राज्यातील खानदेश विभागात गाजर गवताला काँग्रेस गवत म्हणून ओळखतात. काँग्रेस गवत शेतात सहजतेने आढळून येते. याला समूळ नष्ट करणे शेतकऱ्यांपुढे मोठे आव्हान असते.
मात्र जर तुमच्याही शेतात काँग्रेस गवत आढळत असेल तर तुम्ही या गवतापासून जैविक खत तयार केले पाहिजे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे काँग्रेस गवतापासून खत तयार कसे करायचे ? दरम्यान आता आपण याच प्रश्नाचे उत्तर जाणून घेणार आहोत.
कृषी तज्ञांनी गाजर गवतपासून किंवा काँग्रेस गवतापासून खत कसे तयार केले जाऊ शकते याविषयी महत्वाची माहिती दिली आहे. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी सविस्तर.
काँग्रेस गवतापासून खत कसे तयार करणार ?
कृषी तज्ञ सांगतात की, गाजर गवत हे पिके नष्ट करणारे गवत आहे. ते अनावश्यकपणे शेतात वाढते. त्याला पार्थेनियम हिस्टेरोफोरस किंवा काँग्रेस गवत असे म्हणतात. 2010-11 मध्ये झालेल्या संशोधनात असे आढळून आले की हे विषारी गवत शेतकऱ्यांसाठी फायद्याचे ठरू शकते.
कारण की यापासून तयार झालेल्या खतात विविध प्रकारचे पोषक घटक आढळतात. बाजारात उपलब्ध खतापेक्षा या गवताचे खत खूप चांगले असल्याचे अनेक प्रयोगांमधून समोर आले आहे.
या गाजर गवताच्या खतात बाजारातील खतांच्या तुलनेत नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशसारखे घटक जास्त असल्याचे आढळून आले आहे. यामुळे या खताचा वापर जर पिकांसाठी झाला तर पीक उत्पादनात निश्चितच वाढ होण्याची शक्यता आहे.
काँग्रेस गवताचे खत तयार करताना एक गोष्टी लक्षात ठेवा की हे गवत फुल येण्याआधी कापले पाहिजे. कारण त्याची फुले ही शेतीसाठी निरुपयोगी आहेत.
जर गवताला फुल लागले आणि त्यापासून खत तयार केले तर शेतात फुलात असलेल्या बिया देखील पसरतील आणि यामुळे हे गवत आणखी शेतात पसरणार आहे. यामुळे यापासून खत तयार करताना फुल लागण्याआधीच गवताची कापणी करावी.
75 किलो गाजर गवत कापून त्यात 25 किलो माती मिसळा. यानंतर खड्ड्यात टाका. 50 ते 55 दिवस ते असेच राहू द्या. यानंतर काँग्रेस गवतापासून चांगले कंपोस्ट खत तयार होते. याचा वापर तुम्ही मग पिकासाठी करू शकता.