Agriculture News : महाराष्ट्रासहित संपूर्ण देशातील शेतकऱ्यांना हवामान बदलाचा मोठा फटका बसत आहे. हवामान बदलामुळे अवकाळी, अतिवृष्टी, ढगाळ हवामान, गारपीट, दुष्काळ इत्यादी नैसर्गिक संकटांचा शेतकऱ्यांना सामना करावा लागत आहे.
या संकटांमुळे शेतकऱ्यांना शेतीमधून अपेक्षित अशी कमाई होत नसल्याचे विदारक दृश्य गेल्या अनेक वर्षांपासून पाहायला मिळत आहे. गेल्या वर्षातही अशीच परिस्थिती होती.
गेल्या वर्षी अर्थातच 2023 मध्ये पावसाळ्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. यामुळे खरीप हंगामातील पीक उत्पादनात मोठी घट आली. सोयाबीन, कापूस इत्यादी महत्त्वाच्या पिकांमधून शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन मिळाले नाही.
यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. अशा परिस्थितीत हवामान बदलावर उपाय म्हणून कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी करावे लागणार आहे.
दरम्यान जर कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी करायचे असेल तर बांबू लागवड हा एक बेस्ट ऑप्शन ठरणार असल्याचे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले आहे.
नुकत्याच दोन दिवसांपूर्वी पर्यावरणीय शाश्वतता शिखर परिषद आयोजित झाली होती आणि याच कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.
त्यावेळी त्यांनी बांबू लागवड हा हवामान बदलावर योग्य पर्याय ठरणार असे मत व्यक्त केले. एवढेच नाही तर महाराष्ट्रात दहा हजार हेक्टर क्षेत्रावर याची लागवड होणार अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
बाबू लागवडीमुळे पर्यावरणाचे संवर्धन तर होणारच आहे शिवाय शेतकऱ्यांचे अर्थकारण देखील मजबूत होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.
हेच कारण आहे की, शासनाच्या माध्यमातून देखील बांबू लागवडीसाठी प्रोत्साहन दिले जात आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी बांबू लागवड करावी यासाठी शासनाकडून बांबू लागवडीला अनुदान देखील पुरवले जात आहे.
बांबू लागवड ही उसाच्या शेतीपेक्षा फायदेशीर असून यातून शेतकऱ्यांचे आर्थिक परिस्थिती सुधारणार अशी आशा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली असून बांबू लागवडीसाठी शासनाच्या माध्यमातून प्रती हेक्टर सात लाख रुपयांची अनुदान दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले आहे.