Agriculture News : आज मान्सूनचे अंदमानात आगमन होणार आहे. यंदा मान्सूनचे केरळमध्ये 31 मेला आगमन होईल. यानंतर मग महाराष्ट्रात मान्सून आगमन होणार आहे. यावर्षी राज्यात मान्सूनचे वेळेवर आगमन होणार असा अंदाज हवामान खात्याने जारी केला आहे. अर्थातच आठ जूनच्या सुमारास यावर्षी महाराष्ट्रातील तळ कोकणात मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता आहे.
म्हणजेच येत्या काही दिवसात राज्यात मान्सून आगमन होणार आहे. अर्थातच लवकरच खरीप हंगामातील पिकांची पेरणी होणार आहे. खरीप हंगामातील पिकांच्या पेरणीसाठी शेतकरी बांधवांनी जमिनीची पूर्व मशागत सुरू केली आहे.
अनेक ठिकाणी मशागतीचे कामे पूर्ण झाली आहेत. आता शेतकरी बांधव बी-बियाणे आणि खत खरेदी करण्यासाठी औषध दुकानावर गर्दी करत आहेत. मात्र नेहमीप्रमाणेच याही वर्षी बोगस बियाण्यांचा सुळसुळाट राहण्याची शक्यता आहे.
अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या माध्यमातून बोगस बियाणे कसे ओळखायचे आणि बियाणे खरेदी करताना कोणकोणती काळजी घेतली पाहिजे जेणेकरून फसवणूक टाळता येईल असा प्रश्न उपस्थित केला जात होता. दरम्यान आज आपण याच प्रश्नाचे अगदी थोडक्यात उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
जाणकार लोकांनी दिलेले माहितीनुसार, ज्या कंपनीकडे सरकारचा उत्पादन अथवा विक्री परवाना नसतो त्याचे बियाणे बोगस समजले जाते, बीज प्रमाणीकरण यंत्रणे- कडून प्रमाणित नसलेले बियाणे, तपासणी केल्याचा रिपोर्ट नसल्यास बियाणे अनधिकृत किंवा बोगस असल्याचे मानले जाते.
आता तुम्हाला जर असं बोगस बियाणं ओळखायचे असेल तर बोगस बियाण्याच्या पाकिटावर कोणत्याही प्रकारचे तंत्रज्ञान, वाण तसेच कोणत्या क्षेत्रासाठी शिफारस केली याचा उल्लेख नसतो. पाकिटावर मालाच्या गुणवत्तेचे विवरण नसते.
जर तुम्ही खरेदी करत असलेल्या बियाण्यावर देखील असेच आढळले तर तुम्ही असे बोगस बियाणे खरेदी करणे टाळले पाहिजे. जर तुम्हालाही तुमची फसवणूक टाळायची असेल तर नेहमी अधिकृत परवानाधारक कृषी विक्रेत्यांकडून बियाणे, खते खरेदी केली पाहिजेत.
खरेदीवेळी न चुकता पक्के बिल घेतले पाहिजे. देयकात पीक, वाण प्लॉट क्रमांक, वजन, अंतिम मुदत, कंपनीचे नाव संपूर्ण नमूद असावे. कृषी केंद्रधारकाने पक्के बिल संपूर्ण विवरणासह न दिल्यास नजीकच्या कृषी विभागाकडे संपर्क साधावा असे आवाहन जाणकार लोकांनी केले आहे.