Agriculture News :- संपूर्ण राज्यात खरीप हंगामासाठी (Kharip Season) शेतकरी बांधव पूर्वमशागतीच्या (Pre Cultivation) कामांसाठी लगबग करत असताना बघायला मिळत आहेत.
मात्र या वर्षी शेतकरी बांधवांना बियाणापेक्षा (Seeds) खतांची (Fertilizer) चिंता अधिक भेडसावत आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु असलेल्या युद्धामुळे देशात होणारी खतांची आयात (Fertilizer Import) प्रभावित झाली आहे.
यामुळे खरीप हंगामात खतांचा तुटवडा जाणवणार असल्याचे तज्ञांनी देखील आधीच नमूद केले आहे. यासाठी आता कृषी विभागाने (Agricultural Department) देखील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे सुरू केले आहे.
कृषी विभागाने शेतकरी बांधवांना नॅनो युरियाचा (Nano Urea) अधिकाधिक वापर करण्याचा सल्ला दिला आहे. या खरीप हंगामात डीएपी खतांचा तुटवडा जाणवणार असल्याचे सांगितले जात आहे.
यामुळे कृषी विभागाने शेतकऱ्यांना सल्ला दिला आहे की शेतकरी बांधवांनी नॅनो युरिया अधिक वापरावा. कृषी विभागाच्या मते, 500 मिली नॅनो युरियाची बाटली ही 45 किलो युरियाच्या गोणीपेक्षा अधिक प्रभावी आहे.
विशेष म्हणजे नॅनो युरियाचा दर देखील शेतकऱ्यांना विशेष परवडणारा आहे. यामुळे दहा टक्के खतांसाठी होणारा खर्च वाचणार आहे. निश्चितच यामुळे उत्पादन खर्च कमी होणार असून उत्पादनात भरीव वाढ होणार आहे.
500 मिली लिक्विड स्वरूपातला नॅनो युरिया म्हणजे उत्पादन खर्चात बचत
नॅनो युरिया हा लिक्विड स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येतो. हा लिक्विड स्वरूपातला युरिया शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसाठी मदत करणार तर आहेच शिवाय उत्पादन खर्चात देखील बचत होणार आहे.
यामुळे कृषी विभागाकडून देखील शेतकऱ्यांना नॅनो युरिया वापरासाठी वेळोवेळी मार्गदर्शन दिले जात आहे. नॅनो युरिया मुळे केवळ उत्पादनात वाढ होते किंवा उत्पादन खर्चात बचत होते एवढेच नाही तर यामुळे पर्यावरणाचे संवर्धन देखील राखले जाऊ शकते.
लिक्विड स्वरूपात असल्यामुळे या यूरीयाच्या वापराने प्रदूषण टाळता येणे शक्य होणार आहे. असे सांगितले जाते की 100 किलो साधारण युरिया पिकांना लावला तर केवळ 35 टक्के पिकांना त्याचा फायदा होतो.
मात्र पाचशे मिली लिक्विड स्वरूपातला नॅनो युरिया वापरला तर 90 टक्के पिकांना याचा फायदा होतो. निश्चितच लिक्विड स्वरूपातला हा युरिया साधारण युरियापेक्षा अधिक प्रभावी आहे.