Agriculture News : गेल्या काही वर्षांपासून शेतकरी बांधवांना निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फटका बसत आहे. गेली तीन वर्षे ला-निना असल्यामुळे मान्सून काळात अधिक पाऊस बरसला अनेक भागात अतिवृष्टी झाली. यामुळे या ला-निनामुळे झालेल्या पावसामुळे फायदा किती झाला हा तर विश्लेषणाचा भाग आहे मात्र अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
दरम्यान यंदा एलनीनो सक्रिय झाला असून याचा परिणाम मान्सूनवर होत आहे. मान्सून काळात यंदा कमी पर्जन्यमान राहणार असा अंदाज अनेक हवामान संस्थांनी या आधीच व्यक्त केला आहे. खरतर भारतीय हवामान विभागाने मे महिन्यातच मान्सूनचे उशिराने आगमन होणार असे स्पष्ट केले होते. यानुसार एक जूनला केरळमध्ये दाखल होणारा मान्सून सात जूनला आला.
हे पण वाचा :- आज राज्यात उष्णतेची लाट येणार ! पण ‘त्या’ 7 जिल्ह्यात होणार वादळी पाऊस, हवामान विभागाची माहिती
सात जूनला केरळमध्ये मान्सूनचे आगमन झाले आणि तेथून मात्र चार दिवसात महाराष्ट्रातील तळ कोकणात मान्सून पोहोचला. मात्र तेथून पुढे आता मान्सून हालायला तयार नाही. तळकोकणातुन पुढील प्रवासासाठी पोषक हवामान नसल्याचे भारतीय हवामान विभागाने नमूद केले असून आता 23 जून नंतरच मान्सूनचा पुढील प्रवास जोमदार होईल असा अंदाज आहे.
तसेच 23 जून नंतरच महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. एकंदरीत पाऊस लांबला आहे यामुळे शेतकऱ्यांना पेरणी करताना विशेष काळजी घेणे जरुरीचे आहे. अशा परिस्थितीत तज्ञ लोकांच्या माध्यमातून आणि कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा सल्ला देखील जारी करण्यात आला आहे.
या वेळी करा पेरणी
कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, साधारणता तीन ते चार दिवस चांगला पाऊस झाला की, मग वाफसा कंडीशनमध्ये शेतकऱ्यांनी पेरणी केली पाहिजे. सरासरी 80 ते 100 मिलिमीटर पावसानंतर शेतकऱ्यांना पेरणी करण्याचा सल्ला यावेळी देण्यात आला आहे. खरंतर मृग नक्षत्रात पेरणी केली तर शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळते मात्र शेतकऱ्यांनी पेरणी करण्यापूर्वी पुरेसा पाऊस होऊ द्यावा.
मृग नक्षत्रात पेरणी करायची म्हणून समाधानकारक पाऊस नसताना किंवा धुळवाफ पेरणी करू नये असा सल्ला यावेळी तज्ञ लोकांच्या माध्यमातून देण्यात आला आहे. तसेच कृषी विभागाने शेतकऱ्यांना सुधारित वाणाच्या दर्जेदार बियाण्याची निवड करण्याचा सल्ला दिला आहे, बियाण्याची उगवण क्षमता तपासून घेण्याचा आणि बीजप्रक्रिया करण्याचा सल्ला दिला आहे. विशेष म्हणजे 75 ते 100 मिलिमीटर पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी असे आवाहन यावेळी कृषी विभागाने केले आहे.
या पिकांची लागवड करू नका
यंदा मान्सून सुरुवातीच्या टप्प्यातच कमकुवत भासत आहे. यामुळे शेतकरी पुरते हवालदिल झाले आहेत. खरतर मान्सून लांबला असल्याने शेतकऱ्यांना पेरणी करताना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागणार आहे.
ती म्हणजे पाऊस लांबला तर काही पिकांची पेरणी शेतकऱ्यांनी टाळावी. याबाबत कृषी तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार जर पाऊस लांबला तर शेतकऱ्यांनी मूग, वाटाणा आणि उडीद या पिकाची लागवड टाळली पाहिजे. तसेच जर पाऊस लांबला तर शेतकरी बांधव सोयाबीन, तूर, कपाशी आणि बाजरी या पिकांची लागवड करू शकतात.
हे पण वाचा :- कापसाचा हंगाम होणार गोड ! वायद्यात कापूस दरात झाली मोठी वाढ, बाजारात किती मिळतोय भाव? आगामी काळात भाव वाढतील?