Agriculture News : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी दिलासादायक बातमी समोर येत आहे. खरंतर, गेल्यावर्षी जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या काळात खूपच कमी पाऊस झाला. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.
कमी पावसामुळे शेतकरी बांधवांना अक्षरशः पेरणी देखील करता आली नाही. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या माध्यमातून राज्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली जात होती.
यानुसार महाराष्ट्र राज्य शासनाने महाराष्ट्रातील काही भागात दुष्काळ जाहीर केला आहे. शासनाने सुरुवातीच्या टप्प्यात 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला होता हे आपल्याला ठाऊकच असेल.
मात्र, या 40 तालुक्यांशिवाय इतरही अनेक भागांमध्ये कमी पाऊस झाला होता. यामुळे इतरही महसूल मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर केला गेला पाहिजे असे काही जाणकारांनी सांगितले होते. राज्य शासनाने नंतर 1021 महसूल मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर केला.
दरम्यान आता राज्य शासनाने या दुष्काळ जाहीर केलेल्या मंडळापैकी ज्या मंडळाचे विभाजन होऊन नवीन महसूली मंडळे स्थापन करण्यात आली आणि त्या मंडळात अद्याप पर्जन्यमापक यंत्र बसविण्यात आलेले नाही अशा नवीन महसूल मंडळात देखील दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यानुसार, १९ जिल्ह्यांतील २२४ नवीन मंडले दुष्काळ सदृश घोषित केली आहेत. नव्याने जाहीर झालेल्या दुष्काळसदृश मंडळात नगर जिल्ह्यातील सर्वाधिक ३४, त्या पाठोपाठ धुळ्यातील २३, जळगावातील २४ मडंलांचा समावेश आहे.
निश्चितच राज्य शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे संबंधित महसूल मंडळातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून त्यांना दुष्काळी सवलती जाहीर होणार आहेत.
कोणत्या स्वलती लागू होणार ?
महाराष्ट्र राज्य शासनाने काही नव्याने तयार झालेल्या महसूल मंडळात दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय घेतला असल्याने आता या संबंधित मंडळातील शेतकऱ्यांना देखील काही सवलती लागू होणार आहेत.
यात जमीन महसुलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषिपंपांच्या चालू वीजबिलात ३३.५ टक्के सूट, शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परिक्षा शुल्कात माफी, रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर्सचा वापर, शेतीपंपांची वीज जोडणी खंडित न करणे यांसारख्या सवलती आता या सदर महसूल मंडळातील शेतकऱ्यांसाठी लागू केल्या जाणार आहेत.