Agriculture News : शेतकरी बांधवांना गेल्या अनेक वर्षांपासून शेतीमध्ये वेगवेगळ्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे. अवकाळी, अतिवृष्टी नाहीतर मग दुष्काळ यांसारख्या संकटांमुळे शेतकऱ्यांना शेतीमधून अपेक्षित असे उत्पादन मिळवता येत नाही. यावर्षी देखील महाराष्ट्र दुष्काळाच्या उंबरठ्यावर उभा आहे. आगामी काही दिवस पाऊस झाला नाही तर महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पाहायला मिळू शकतो.
दुष्काळामुळे साहजिकच पीक उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येण्याची शक्यता आहे. गेल्या महिन्यात समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे काही ठिकाणी तर पिकांनी अक्षरशः माना टेकल्या आहेत. मात्र आता दुष्काळी परिस्थितीवर यशस्वीरित्या शेतकऱ्यांना मात करता येणार आहे. यासाठी खानदेश मधील एका शेतकरी पुत्राने भन्नाट संशोधन केले आहे.
या संशोधनानुसार आता पिकांना तब्बल दोन महिने पाणी भरले नाही तरी देखील पीक जगू शकते. मिळालेल्या माहितीनुसार पीक लागवडीसाठी तसेच पीक लागवड केल्यानंतर साधारण दोन महिन्यांपर्यंत पिकाला पाणी मिळाले नाही तरी देखील पीक तग धरू शकते असे एक संशोधन करण्यात आले आहे. म्हणजे दुष्काळी परिस्थितीमध्ये देखील पीक मरणार नाही. वॉटर कप टू टॅकल ड्रॉट सिच्युएशन असे या संशोधनाचे नाव आहे.
हे संशोधन जळगाव जिल्ह्याच्या चाळीसगाव तालुक्यातील मौजे ब्राह्मण शेवगे या गावातील प्रकाश सुनील पवार यांनी केले आहे. प्रकाश सुनील पवार यांचे हे संशोधन भारत सरकारच्या जर्नल मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. याशिवाय त्यांचे आणखी एक संशोधन या जर्नल मध्ये प्रकाशित झाले आहे. प्रकाश यांचे एकूण दोन संशोधन भारत सरकारच्या जर्नल मध्ये प्रकाशित झाले असून याबाबत प्रकाश यांना वीस वर्षांपर्यंत अधिकार देखील मिळाले आहे.
खरंतर प्रकाश हे शेतकरी कुटुंबातून येतात. त्यांचे वडील अल्पभूधारक शेतकरी आहे. तसेच त्यांची आई अशा सेविका म्हणून काम करते. प्रकाश स्वतः शेतकरी कुटुंबातून येत असल्याने त्यांना अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या व्यथा चांगल्यापैकीच ठाऊक आहेत. हेच कारण आहे की, त्यांनी दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यास पिके तग धरू शकतील असे संशोधन केले आहे.
या संशोधनामुळे आता पिक लागवडीसाठी तसेच पीक लागवड केल्यानंतर दोन महिन्यांपर्यंत पिकाला पाणी मिळाले नाही तरी देखील पिके तग धरू शकतील. त्यामुळे शेतकऱ्यांचा मोठा फायदा होणार आहे. तसेच पावसाची वाट न पाहता आता शेतकऱ्यांना पीक लागवड करता येणार आहे. याबाबत प्रकाश पवार यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
त्यांनी सांगितल्याप्रमाणे, या संशोधनाच्या पूर्ण चाचण्या 40 ते 45 अंश सेल्सिअस मध्ये घेण्यात आल्या आहेत. यामुळे वेळेवर पाऊस आला नाही तर त्यामुळे होणारे नुकसान टाळता येणार आहे. त्यामुळे कमी पाण्यात पीक उत्पादित करता येईल आणि यामुळे शेतकरी आत्महत्या बऱ्यापैकी कमी होतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे.