Agriculture News : भारत हा एक शेतीप्रधान देश असून शेतीमध्ये आता नवनवीन अभिनव उपक्रम राबवले जात आहेत. या नवनवीन प्रयोगाच्या माध्यमातून भारतीय शेती आणि शेतकरी हायटेक बनू पाहत आहेत.
दरम्यान असाच एक प्रयोग पुणे जिल्ह्यातील बारामती येथील कृषी विज्ञान केंद्राने सुरु केला आहे. ज्यामुळे महाराष्ट्रातील नव्हे-नव्हे तर देशातील सर्वच शेतकऱ्यांनां रासायनिक खतांपासून मुक्ती मिळण्यास मदत होणार आहे. विशेष म्हणजे हा प्रयोग सेंद्रिय शेतीचा नसून होमिओपॅथिक औषधांचा प्रयोग आहे.
म्हणजेच ज्या पद्धतीने मानवाचे आजार बरे करण्यासाठी होमिओपॅथिक औषधांचा उपयोग केला जातो, अगदी त्याच पद्धतीने पिकाच्या जोमदार वाढीसाठी आणि किड नियंत्रणासाठी होमिओपॅथिक औषधांचा वापर करून बारामती येथील एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्राने ऊस, कांदा, हरभरा तसेच इतर तरकारी पिकांची यशस्वी शेती करून दाखवली आहे. या केवीके मधील शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार हा भारत देशातील पहिलाच प्रयोग आहे.
केवीके मधील शास्त्रज्ञ संतोष करंजे यांनी महाराष्ट्र टाइम्सला दिलेल्या माहितीनुसार, होमिओपॅथिक औषधांचा, खतांचा वापर कांदा गहू हरभरा ऊस पालेभाज्या फळभाज्या यांसारख्या पिकांवर सुरू झाला असून यामुळे पिकाची जोरदार वाढ होत असून अधिक उत्पादन मिळत आहे. शिवाय यामुळे विषमुक्त शेतमाल उत्पादित करण्यास मदत होणार आहे. आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, कर्नाटक मधील बिदर येथील डॉक्टर वीरेंद्र कुमार पाटील गेल्या अनेक वर्षांपासून शेती पिकासाठी होमिओपॅथिक औषधांची व खतांची निर्मिती करण्यासाठी झगडत आहेत.
अशातच डॉक्टर वीरेंद्र कुमार पाटील यांच्या संशोधनातून बारामती येथील केवीके मध्ये भाजीपाला तृणधान्य कडधान्य पिकांचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. आता मेथी कोथिंबीर यांसारखी पालेभाज्या पिके 100% होमिओपॅथिक औषधे व खतांच्या वापराने उत्पादित केले जाणार आहेत. विशेष म्हणजे होमिओपॅथिक औषधांचा वापर करून कांदा व हरभरा पिकांवर येणाऱ्या वेगवेगळ्या रोगांचे नियंत्रण मिळवता येणे शक्य होणार असल्याचे शास्त्रज्ञांनी नमूद केले आहे. होमिओपॅथिक औषधांचा वापर करून कीड नियंत्रण करण्यास यश आलं असल्याचे सांगितले जात आहे.
निश्चितच होमिओपॅथिक औषधांचा आणि खतांचा वापर भारतीय कृषी क्षेत्राला रासायनिक कीटकनाशक आणि खतांपासून वाचवेल यात तीळ मात्र देखील शंका नाही. खरं पाहता रासायनिक खतांचा अमर्यादित वापर केला गेला असल्याने जमिनीचा पोत ढासळला आहे. रासायनिक कीटकनाशकांमुळे निश्चितच लवकर किडनियंत्रण मिळवता येणे शक्य होते मात्र रासायनिक किटकनाशक वापरून उत्पादित झालेला शेतमाल मानवी आरोग्यासाठी खूपच घातक असतो.
शिवाय यामुळे जमिनीचा पोत कमी होतो म्हणजेच जमीन नापीक बनते. परिणामी सातत्याने रासायनिक खत आणि कीटकनाशक वापरून उत्पादकता कमी होत असते. म्हणजेच रासायनिक खत आणि कीटकनाशक वापराने जमिनीचे आरोग्य, मानवाचे आरोग्य, तसेच पर्यावरण धोक्यात येते.
शिवाय शेतकऱ्यांना अधिकचा खर्च करावा लागतो. मात्र, या होमिओपॅथिक औषधांचा आणि खतांचा वापर करून जर पीक उत्पादित केलं तर शेतकऱ्यांचा खर्च वाचेल तसेच विषमुक्त शेतमाल उत्पादित होण्यास मदत होईल. निश्चितच, बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रात सुरू झालेला हा प्रयोग भारतीय शेतीला एक वेगळा आयाम उपलब्ध करून देणार आहे.