Agriculture Minister Dhananjay Munde On Bamboo Farming : महाराष्ट्र हे एक शेतीप्रधान राज्य आहे. येथील निम्म्याहून अधिक जनसंख्या ही प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या शेती क्षेत्रावर आधारित आहे. अशा परिस्थितीत राज्यातील शेती क्षेत्राला बळकटी देण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सरकारकडून विविध प्रयत्न केले जात आहेत.
शेतकऱ्यांचे उत्पन्न कसे वाढेल यासाठी शासनाकडून विविध प्रयत्न होत असून याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून आता शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीसाठी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी एक मोठी घोषणा केली आहे. वर्तमान शिंदे-फडणवीस-पवार सरकारने अर्थसंकल्प 2023 24 मध्ये अनेक महत्त्वाच्या शेतकरी हिताच्या योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
एक रुपयात पिक विमा योजना, पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धरतीवर नमो किसान सन्मान निधी या दोन महत्त्वाच्या योजनांची अंमलबजावणी सरकारने सुरू केली आहे. अशातच आता कृषिमंत्री मुंडे यांनी राज्यातील शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी अर्थसहाय्य पुरवले जाणार असल्याचे जाहीर केले आहे.
आता राज्यातील शेतकऱ्यांना एक हेक्टर आत बांबू लागवड करण्यासाठी सात लाख रुपयांचे अनुदान दिले जाईल, अशी मोठी घोषणा कृषिमंत्री मुंडे यांनी शुक्रवारी केली आहे. लोदगा येथील फिनिक्स फाउंडेशनच्या कृषी महाविद्यालय, बांबू टीश्यू कल्चर, बांबू फर्निचर प्रकिया उद्योगाच्या भेटीनंतर झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
कृषिमंत्री महोदय यांनी सांगितल्याप्रमाणे, बांबू हे पिक मातीचे आरोग्य वाढविणारे आहे. दिवसेंदिवस रासायनिक खतांचा बेधुंद वापर होत असल्याने जमिनीची सुपीकता कमी होत चालली आहे. यामुळे जमिनीची सुपीकता वाढवणे आवश्यक आहे. जमिनीचा कर्ब वाढवणे जरुरीचे असल्याने आता बांबू लागवडीला चालना दिली जाणार आहे.
लातूर आणि सातारा येथे प्रायोगिक तत्वावर होणारी बांबू लागवड आता बीडमध्येही केली जाणार असे कृषिमंत्र्यांनी सांगितले. तसेच तीन बाय सहाचा खड्डा आणि त्यात लागणारे बांबूच्या रोपासाठी प्रत्येकी पन्नास रुपये अनुदान दिले जाणार आहे.
म्हणजे हेक्टरी शेतकऱ्यांना 7 लाखांपर्यंतचे अनुदान मिळेल आणि मनरेगातून ज्याप्रमाणे शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी अनुदान दिले जात आहे तसेच अनुदान प्रत्येक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी देखील मिळावे यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन देखील कृषिमंत्र्यांनी यावेळी दिले आहे.