Agniveer Bharati : देशभरातून भारतीय सैन्यात जाण्यासाठी लाखो तरुण सैन्य भरतीची तयारी करत असतात. महाराष्ट्रातही लाखो तरुण या सैन्य भरतीसाठी तयारी करत आहेत. दरम्यान या तरुणांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे.
भारतीय सैन्य दलाच्या माध्यमातून भारतीय सैन्यात निवडीसाठी जी काही अग्नीवीर भरती राबवली जात आहे या भरती प्रक्रियेमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. नुकतेच काल-परवा या भरती प्रक्रियेमध्ये आयटीआय पॉलिटेक्निक या शाखेतील विद्यार्थ्यांनाही समाविष्ट करण्यासाठी बदल भरती प्रक्रियेत करण्यात आला. दरम्यान आता या भरतीप्रक्रियेच्या निकषात बदल करण्यात आला आहे.
या भरतीसाठी आता नवीन निकष भारतीय सैन्याच्या माध्यमातून लावण्यात आले आहेत. भारतीय सैन्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार आता या पदभरती अंतर्गत ज्या उमेदवारांची निवड होईल म्हणजेच ज्या सैनिकांची निवड होईल तो मानसिक दृष्ट्या आणि शारीरिक दृष्ट्या सक्षम असणे अनिवार्य राहणार आहे. यासाठी भरतीचे निकष थोडेसे बदलण्यात आले आहेत.
या अनुषंगाने लेखी प्रवेश परीक्षेमध्ये मूलभूत असे बदल करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. सैन्य दलाने दिलेल्या माहितीनुसार यापुढे मानसिक दृष्ट्या मजबूत असलेल्या उमेदवारांचीच निवड सैनिक म्हणून होणार आहे. याबाबत भारतीय सैन्यात कार्यरत असलेल्या कर्नल जी सुरेश यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या वृत्तानुसार, सैन्य दलाच्या भरती प्रक्रियेत आधी शारीरिक चाचणी घेतली जायची आणि नंतर लेखी परीक्षा ही घेतली जात असे.
मात्र आता यामध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. आता लेखी परीक्षा ही या भरती प्रक्रियेचा पहिला टप्पा राहणार आहे. म्हणजे भरती होणारे उमेदवार हे मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या सक्षम किंवा मजबूत आहेत का? हे आता भारतीय सैन्यात सामील होण्यासाठी अति महत्त्वाचे राहणार आहे. तसेच लेखी परीक्षा झाल्यानंतर संबंधित उमेदवाराची शारीरिक आणि मग वैद्यकीय चाचणी घेतली जाईल. यासोबतच या भरती प्रक्रियेच्या लेखी परीक्षेसाठी उमेदवारांना पाचशे रुपये शुल्क भरावे लागणार आहे.
मात्र या पाचशे रुपयांपैकी अडीचशे रुपये भारतीय सैन्य उमेदवाराच्या वतीने देणार आहे तर अडीचशे रुपये हे थेट उमेदवारालाच द्यावे लागणार आहेत. याशिवाय आता अग्निवीर भरतीसाठी वर्षातून एकदाच नोंदणी करता येणार आहे. आता नवीन भरती प्रक्रिया अंतर्गत आता सर्वप्रथम सीईई म्हणजेच कॉमन इंट्रान्स टेस्ट घेतली जाईल आणि त्यानंतर शारीरिक चाचणी आणि वैद्यकीय चाचणी पार पडेल.
सध्या अग्नीवर भरतीसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू असून इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन भारतीय सैन्याच्या माध्यमातून केलं जात आहे. दरम्यान अर्ज करण्यापूर्वी इच्छुक उमेदवारांनी पात्रता आणि निवडीचे निकष व्यवस्थितरीत्या अधिसूचनेच्या माध्यमातून वाचून घ्यायचे आहेत.