krushi marathi :- राज्यातील कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांना येत्या 2 मे रोजी नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात सकाळी 11 वाजता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
कृषी क्षेत्रात फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रात तसेच उत्पादन वाढीत उल्लेखनिय कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना कृषी पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यावर्षी आयोजित कार्यक्रमात 198 पुरस्कारार्थ्या शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
गेल्या दोन वर्षात कोरोनाच्या संकटामुळे कृषी विभागाचे पुरस्कार देण्यात आले नव्हते. त्यामुळे या सोहळ्यात 2017, 2018 व 2019 या तीन वर्षांचे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
या पुरस्कार प्रदान कार्यक्रमांमध्ये शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रातील विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे. त्यात डॉ.पंजाबराव देशमुख कृषिरत्न, जिजामाता कृषीभूषण, कृषीभूषण सेंद्रीय शेती, वसंतराव नाईक कृषीभूषण, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी,
वसंतराव नाईक शेतीमित्र, उद्यान पंडित, पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवा रत्न, पीक स्पर्धा विजेते अशा पुरस्कारांनी शेतकऱ्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास इतर मान्यवर ही उपस्थित राहणार आहेत. त्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषीमंत्री दादाजी भुसे, नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री तथा अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, फलोत्पादन राज्यमंत्री कु.आदिती तटकरे,
कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, रोजगार हमी फलोत्पादनमंत्री संदीप भुमरे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे.