Farmer Success Story :- पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील कारीमधील रणधीर बाळासाहेब जेधे यांनी नाटंबीमध्ये पारंपरिक शेतीला बगल देत पॉलिहाउस उभारून गुलाब शेतीचा मळा फुलविला आहे. या शेतीमधून दररोज फुलांच्या माध्यमातून चांगले उत्पन्न मिळत आहे. शेतकऱ्यांसमोर चांगला आदर्श निर्माण केला आहे. शेतकऱ्याने पारंपरिक भातशेतीला फाटा देत पॉलिहाउसमध्ये डच गुलाबाची शेती यशस्वी केली आहे.
भाताची शेती म्हणून ख्याती असलेल्या या परिसरात रासायनिक खतांचा, औषधांचा कमीत कमी वापर आणि सेंद्रिय व जिवाणू खताचा जास्तीत जास्त वापर करून नैसर्गिक पद्धतीने गुलाब या नगदी पिकाने शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.
त्यासाठी त्यांनी विविध पॉलिहाउसला भेट घेत आवश्यक तंत्रज्ञानाची माहिती घेऊन गुलाबाची शेती घेण्याचे ठरवले. यांनी त्यांच्या ३० गुंठे क्षेत्राची निवड केली. यात डच जातीच्या गुलाबाची २५ हजार रोपे आणली.
शेतीच्या मशागतीनंतर गादी वाफे तयार करून त्यावर दोन रोपांत २५ सें.मी. तर दोन ओळींत ८० सें.मी. अंतर ठेवून लागवड केली. लागवडीपूर्वी २४ तास अगोदर रोपांना पाणी दिले. लागवडीच्या वेळी २ किलो सुपर फॉस्फेट, १ किलो कॅल्शियम अमोनियम नायट्रेट आणि ५०० ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश दिले.
रोज एक तास ठिबकनेच पाणी दिले. लागवडीनंतर पंधरा दिवसांनी जिवामृत, अमृतपाणी, गायीच्या शेणापासून तयार झालेले जिवाणू संवर्धन आदी सेंद्रिय खतांचा वापर केला. उत्तम वाढीसाठी आणि दर्जेदार उत्पादनासाठी लागवडीनंतर प्रति झाडाला १० ग्रॅम डी.ए.पी. आणि दोन महिन्यांनंतर २ ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट दिले.
हरितगृहात द्रवरूप खते पाण्यात मिसळून दिली. प्रत्येकी २०० पीपीएम नत्र व पालाश पाण्यातून रोपांना दिले. ८५ ग्रॅम पोटॅशिअम नायट्रेट व ८० ग्रॅम अमोनियम नायट्रेट प्रथम प्रति लीटर पाण्यात घेऊन ते नंतर २०० लीटर पाण्यात मिसळून झाडांना दिले. पावसाळ्यातही गरजेनुसार या पिकाला पाणी दिले.
झाडाला लगेच फुले येऊ लागल्याने झाडांच्या वाढीच्या काळात वाटाण्याच्या आकाराच्या कळ्या झाल्यावर त्या काढून टाकल्या. झाडांची वाढ व्यवस्थित झाल्यावर झाडांची छाटणी करताना मुख्य फांद्या तशाच ठेवून त्यांच्या उपफांद्यांची छाटणी धारदार कात्रीने केल्याने फुलांची संख्या वाढण्यास मदत झाली. पर्यायाने आर्थिक उत्पन्न वाढण्यास मदत झाली. तीन महिन्यांनंतर फुले घेण्यास सुरुवात केली. फुलांचा उपयोग डेकोरेशनसाठी वापर करतात.
कोरोना काळात फुलांना मागणी नसल्याने मोठा तोटा सहन करावा लागला. नवीन लागवड केल्यावर व्यवसायात स्थिरता आली. गुलाबाची फुले दोन दिवसांतून ८० ते ९० जुडी पुणे मार्केटमध्ये पाठवली जाते. साधारणतः ९० ते २०० रुपयांपर्यंत जुडीला दर मिळतो.
फुलदांड्याची लांबी, दांड्याची जाडी, फुलाचा आकार, पाने, ताजेतवानेपणा यावर प्रतवारी ठरते. त्यामुळे प्रतवारी करताना विशेष काळजी घ्यावी लागते. त्यानुसार दर ठरतो. त्यामुळे जुडीमध्ये सारख्या प्रतवारीची फुले निवडून जुडी तयार करावी लागते. एक फूल जरी खराब असेल तर त्याचा दरावर परिणाम होतो. – रणधीर जेधे, प्रगतिशील शेतकरी, कारी, ता. भोर