उच्चशिक्षित तरुणांनी शेतीमध्ये येणे हे शेती क्षेत्राच्या विकासाच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहे. कारण तरुणाई म्हटले म्हणजे कायम नवनवीन आणि वेगवेगळ्या गोष्टी करण्याकडे त्यांचा कल असतो
व त्यामुळे उच्चशिक्षित तरुण-तरुणी शेतीकडे आल्यामुळे आता शेतीमध्ये देखील ते अशाच नवनवीन पिकांचा प्रयोग आणि तंत्रज्ञानाचा वापर करण्याकडे भर देत असल्यामुळे नक्कीच यामुळे कृषी क्षेत्राचा विकास होण्यास मदत झाली आहे.
यासोबतच असे तरुण स्वतःच्या आर्थिक विकास देखील या माध्यमातून साध्य करत आहेत. अगदी याच मुद्द्याला धरून जर आपण पूर्णा तालुक्यातील कात्नेश्वर या गावचे उच्चशिक्षित आयटी इंजिनिअर असलेले प्रमोद चापके या तरुणाचा विचार केला तर या तरुणाने दोन एकर क्षेत्रात असलेल्या ऊसामध्ये आंतरपीक म्हणून ब्रोकोली या विदेशी भाजीपाला पिकाची लागवड करण्याचा प्रयोग केला व तो यशस्वी करून आतापर्यंत लाखोत आर्थिक उत्पन्न मिळवण्यामध्ये यश मिळवले आहे. याच तरुणाची यशोगाथा आपण या लेखात बघणार आहोत.
ऊस पिकात केली ब्रोकोलीची आंतरपीक म्हणून लागवड
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पूर्णा तालुक्यातील कातनेश्वर या गावचे उच्चशिक्षित आयटी इंजिनिअर असलेले प्रमोद शिवाजीराव चापके यांनी वडील शिवाजीराव चापके व भाऊ रामप्रसाद चापके त्यांचे सहाय्य घेऊन शेतामध्ये अनेक प्रयोग राबवायला सुरुवात केली व याच प्रयोगाचा भाग म्हणून त्याने दोन एकर क्षेत्रामध्ये असलेल्या उसात आंतरपीक म्हणून ब्रोकोली या भाजीपाला पिकाची लागवड करण्याचे ठरवले व योग्य नियोजन करून ब्रोकोलीची लागवड देखील केली.
हा ऊस पिकातील ब्रोकोली पिकाच्या लागवडीचा प्रयोग जवळपास अडीच महिने कालावधीत यशस्वी झाला व ब्रोकोलीचे उत्पादन मिळायला लागले आहे व आतापर्यंत सहा टन ब्रोकोलीचे उत्पादन त्यांना मिळाले आहे. अजून पुढे तीन टन उत्पादन मिळेल अशी अपेक्षा त्यांना आहे. प्रमोद चापके यांनी ब्रोकोलीची विक्री करण्याकरिता नाशिक येथील एका व्यापाऱ्याला काही टन मालाची विक्री केली तर काही माल नांदेड, परभणी तसेच हैदराबाद इत्यादी ठिकाणी विक्री केला.
आतापर्यंत सहा टन ब्रोकोली फ्लॉवर त्यांनी विकले व त्यातून खर्च वजा करून अडीच लाख रुपये निव्वळ नफा अडीच महिन्यात त्यांनी मिळवला. अजून देखील ब्रोकोलीची काढणी सुरू असून येणाऱ्या काळात तीन टन ब्रोकोलीचे उत्पादन मिळण्याची अपेक्षा त्यांना असून यातून 70 ते 80 हजार रुपये उत्पन्न मिळेल अशी देखील अपेक्षा त्यांना आहे.
विशेष म्हणजे ऊस पिकामध्ये आंतरपीक म्हणून ब्रोकोली लागवडीचा प्रयोग यशस्वी करून दाखवल्यामुळे जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी अनिल गवळी व आत्मा प्रकल्प संचालक दौलत चव्हाण इत्यादी मान्यवरांनी प्रमोद चापके यांचे कौतुक केलेच.परंतु जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी देखील त्याला बोलवून घेत त्यांचे कौतुक केले आहे.
यावरून आपल्याला दिसून येते की जर शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून वेगवेगळे प्रयोग केले तर ते यशस्वी होतात व त्यातून लाखोत उत्पन्न मिळवणे देखील शक्य होते हे आपल्याला दिसून येते.