पिक उत्पादन वाढीसाठी सर्व प्रकारचे व्यवस्थापन करणे गरजेचे असते व हे व्यवस्थापन योग्य वेळेला होणे तितकेच गरजेचे असते. पीक व्यवस्थापनामध्ये खत व्यवस्थापन तसेच पाणी व्यवस्थापन, रोग व किडींचे व्यवस्थापन इत्यादी व्यवस्थापनाला खूप महत्त्व आहेच.परंतु जमिनीची पूर्व मशागती पासून तर कापणी पर्यंत विविध बारीक-सारीक गोष्टींवर लक्ष देणे देखील तितकेच गरजेचे असते. जेव्हा या सगळ्या व्यवस्थापनाच्या पद्धती अगदी योग्य पद्धतीने अवलंबल्या जातात तेव्हाच एकरी जास्तीचे उत्पादन मिळते.
अगदी हीच बाब जर आपण नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात असलेल्या गंगाधरी या गावचे सुनील जुन्नरे यांची पाहिली तर ती काहीशी या पद्धतीचीच आहे. या शेतकऱ्याने मका पिकामध्ये मास्टरी मिळवली आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. कारण त्यांचे बारा ते पंधरा एकर मक्याचे क्षेत्र असते व त्यामधून ते एकरी तब्बल 35 ते 42 क्विंटल पर्यंत मक्याचे उत्पादन घेतात व यामध्ये सातत्य देखील त्यांनी ठेवलेले आहे. त्यामुळे आपण त्यांचे मक्याचे व्यवस्थापन नेमके कसे असते? याबद्दलची माहिती बघू.
सुनील जुन्नरे अशा पद्धतीने करतात मक्याचे व्यवस्थापन
सगळ्यात अगोदर त्यांनी मक्याची टोकन पद्धतीने लागवड पद्धत होती त्यामध्ये थोडासा बदल केला व मागील आठ वर्षापासून त्यांनी वानांच्या निवडीपासून ते लागवडीचे पद्धत, यांत्रिकीकरण तसेच काढणीनंतरचे व्यवस्थापन आणि चाऱ्याचे उत्पादन या अंगाने खूप महत्त्वपूर्ण बदल केले. मका पिकाला जास्त प्रमाणात पोषक तत्वांची आवश्यकता असल्यामुळे एका वर्षाच्या आड ते एकरी 20 क्विंटल कोंबडी खत व शेणखत यांचा मिसळून वापर करतात व जमिनीचा पोत टिकवण्यावर फोकस करतात. जमिनीचे खोलगट नांगरणी करून रोटावेटर मारून जमीन भुसभुशीत करून चार फुटांचे सरी पाडतात व ठिबकच्या नळ्या पसरून नळीच्या दोन्ही बाजूला लागवड करतात.
वानांची निवड करताना प्रामुख्याने जास्त उत्पादन देणाऱ्या 110 ते 115 दिवसात येणाऱ्या वाणाची निवड करतात. तसेच लागवड करताना ती पूर्व पश्चिम करतात व त्यामुळे हवा खेळती राहण्यास मदत होते. तसेच खत व्यवस्थापन करताना ते लागवड करण्यापूर्वी 15:15:15,10:26:26, डीएपी एकरी दीड गोणी प्रमाणे मात्रा देतात. तसेच दोन रोपामध्ये सव्वा ते दीड फुटाचे अंतर ठेवून एकरी 26 ते 27000 दाण्याचा वापर होईल अशा पद्धतीने लागवड करतात.
तसेच मका पिकावर अळीचा प्रादुर्भाव होऊ नये याकरिता गरजेनुसार प्रतिबंधात्मक रासायनिक व जैविक फवारणी घेतात. जेव्हा मका पिकाचा वाढीचा कालावधी असतो तेव्हा ठिबक व फवारणीच्या माध्यमातून नॅनो युरिया तसेच कॅल्शियम, मॅग्नेशियम या सह सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा करण्यावर ते भर देतात. जेव्हा मका पिकाचा दाणे भरण्याची अवस्था असते तेव्हा ते 0:0:50 एकरी पाच किलो आठ दिवसांनी मात्रा देतात.
सुनील जुन्नरे यांचे कसे आहे मका पिकाचे उत्पादन आणि त्या माध्यमातून मिळणारा आर्थिक नफा?
सुनील जुन्नरे एकरी 35 ते 42 क्विंटल पर्यंत मका उत्पादन घेतात व विशेष म्हणजे यामध्ये त्यांनी सातत्य ठेवलेले आहे. एकरी त्यांना 20 ते 22 हजार रुपयांपर्यंत खर्च येतो व प्रतिक्विंटल 2000 ते 2300 पर्यंत त्यांना मक्याला दर मिळतो. या व्यतिरिक्त त्यांना एकरी 25 ते 30 टन मक्याचा चारा देखील मिळतो व पशुपालक एकरी दहा हजार रुपये प्रमाणे तो खरेदी करतात. म्हणजेच मक्याच्या चाऱ्यातून देखील त्यांना अतिरिक्त आर्थिक फायदा मिळतो. तसेच मक्यापासून ते मुरघास तयार करतात व त्यामुळे जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न देखील मिटतो.