Annapurna Yojana : सध्या महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेची चर्चा आहे. या योजनेचा पात्र महिलांना लाभही देण्यात आला आहे. लाडकी बहिणी योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जाणार आहेत. अर्थातच एका वर्षात एका पात्र महिलेला 18 हजार रुपये मिळणार आहेत.
दरम्यान, लाडक्या बहिणीचे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे तीन हजार रुपये नुकत्याच दोन दिवसांपूर्वी पात्र महिलांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत. लाडकी बहीण प्रमाणेच राज्यात आणखी एक काही योजनेची चर्चा आहे आणि ती योजना म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना. या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना एका वर्षात तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत.
या योजनेसाठी उज्वला योजनेचे लाभार्थी आणि लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी पात्र ठरणार आहेत. दरम्यान, याच योजनेसंदर्भात आता एक मोठी माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी 70 टक्के लाडक्या बहिणी अपात्र ठरणार आहेत. नेमके याचे कारण काय आहे ? हेच आज आपण थोडक्यात समजून घेणार आहोत.
अन्नपूर्णा योजनेचा जीआर कधी निघाला ?
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा जीआर 30 जुलै 2024 ला निर्गमित करण्यात आला आहे. या योजनेचा राज्यातील उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना आणि लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना लाभ दिला जाणार आहे.
परंतु, या योजनेसाठी 70 टक्के लाडक्या बहिणी अपात्र ठरणार अशी माहिती समोर येत असतात. प्रधानमंत्री उज्ज्वला योजना वगळली तर बहुतांश गॅस कनेक्शन हे घरातील पुरुषांच्या नावे आहे. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील 70 टक्क्यांपेक्षा अधिक महिला यापासून वंचित राहणार असे दिसत आहे.
यवतमाळ जिल्ह्यासारखीच परिस्थिती राज्यातील इतरही जिल्ह्यांमध्ये आहे. यामुळे आता शिंदे सरकार यावर काय तोडगा काढणार हे पाहण्यासारखे ठरणार आहे. शिंदे सरकार अन्नपूर्णा योजनेच्या नियमात बदल करणार का ? ज्या लाडक्या बहिणींच्या कुटुंबातील सिलेंडर त्यांच्या पतीच्या नावावर आहे त्यांनाही या योजनेचा लाभ दिला जाणार का? हे पाहणे खरंच उत्सुकतेचे राहणार आहे.
सध्या अन्नपूर्णा योजनेचे जे नियम आहेत त्या नियमानुसारच जर लाभ मिळाला तर जवळपास 70% लाडक्या बहिणी अन्नपूर्णा योजनेला अपात्र राहणार आहेत. यामुळे ही योजना किती प्रमाणात यशस्वी होते हे येणारा काळच ठरवणार आहे. याचा कोणकोणत्या महिलांना लाभ मिळणार हे देखील आगामी काळात स्पष्ट होणार आहे.