7/12 Utara Name Change : जर तुम्हीही शेतकरी असाल किंवा शेतकरी कुटुंबातून येत असाल तर आजची ही बातमी तुमच्या कामाची ठरणार आहे. आज आपण सातबारा उताऱ्यावर चुकीचे नाव लागले असेल तर नावात बदल करता येतो का? या संदर्भात सरकारचे काय नियम आहेत याविषयी अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
खरेतर शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचा सातबारा उतारा हा एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे. गाव नमुना नंबर 7 आणि गाव नमुना नंबर 12 मिळून सातबारा उतारा बनत असतो.
सातबारा उताऱ्यावरून जमीन मालकाकडे किती जमीन आहे, कोणती जमीन आहे याची सर्व इत्यंभूत माहिती या उताऱ्यात दडलेली असते. हा जमिनीच्या मालकीचा प्राथमिक पुरावा म्हणून ओळखला जातो.
जमिनीच्या मालकीचा सातबारा उतारा हा एक अंतिम पुरावा आहे. या उताऱ्यावर शेतकऱ्याचे नाव, किती जमीन आहे, गाव, तालुका, जिल्हा इत्यादी गोष्टी लिहिलेल्या असतात.
सातबारा उताऱ्यावर दरवर्षी पिक पाहणीची नोंदणी केली जात असते. मात्र सातबाराची नवीन पुस्तके ही एका दशकानंतर म्हणजे दहा वर्षानंतर लिहिली जातात.
मात्र, सातबारा उताऱ्यावरील नावात जर काही चूक झाली असेल ? सातबारा उताऱ्यावर काही चुका झालेल्या असतील तर त्या दुरुस्त होऊ शकतात का हा मोठा प्रश्न असतो.
शेतकऱ्यांच्या माध्यमातून सातत्याने या संदर्भात विचारणा केली जात असते. तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की सातबारा उताऱ्यावर काही चुका झालेल्या असल्यास त्या चुका दुरुस्त करण्याचे अधिकार तहसीलदारांना आहेत.
सातबाऱ्यावर जर चुकीचे नाव लागले असेल तर संबंधित तहसीलदाराकडे चूक दुरुस्ती करण्यासाठी अर्ज करावा लागतो. महाराष्ट्र महसूल अधिनियम कलम १५५ नुसार हा अर्ज तहसीलदार महोदयांकडे सादर करावा लागतो.
हा अर्ज सादर करताना आवश्यक कागदपत्रे देखील द्यावी लागतात. तहसीलदार मग सदर अर्जाची आणि कागदपत्रांची योग्य पडताळणी करतात आणि मग सातबारा उताऱ्यावरील चूक दुरुस्त केली जाते. यासाठी वकिलामार्फत अर्ज करण्याची काही आवश्यकता नसते.
शेतकरी बांधव स्वतः तहसीलदार महोदय यांच्याकडे अर्ज करू शकतात. मात्र अनेकदा सातबारा उताऱ्यावरील चूक दुरुस्त करण्यासाठी शेतकऱ्यांना शासकीय कार्यालयांचे हेलपाटे मारावे लागतात. यामुळे शेतकरी बांधव वकिलामार्फत सातबारा उताऱ्यावरील चूक दुरुस्त करून घेतात.