शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! कोरडवाहू भागातील शेतकऱ्यांसाठी कापसाच्या 3 नवीन जाती विकसित, वाचा या जातीच्या विशेषता

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Cotton Farming Maharashtra : कापसाला व्हाईट गोल्ड अर्थातच पांढरं सोनं म्हणून ओळखलं जातं. मात्र या व्हाईट गोल्डने शेतकऱ्यांना चांगलेच वाईट अनुभव दिले आहेत. गेल्या दोन वर्षांपासून शेतकऱ्यांना कापसाचे पीक परवडत नसल्याचे विदारक दृश्य पाहायला मिळत आहे. एकतर कापसाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येत आहे आणि दुसरे बाजारात मालाला अपेक्षित असा भाव मिळत नाही.

परिणामी शेतकऱ्यांची दुहेरी कोंडी होत असून अनेकदा शेतकऱ्यांना पिकासाठी आलेला खर्च देखील भरून काढता येत नाही. कापूस लागवडीचा विचार केला असता महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर येते. मात्र जेव्हा उत्पादनाचा विषय निघतो तेव्हा गुजरात राज्याचा पहिला नंबर लागतो. म्हणजेच आपल्या राज्यात कापसाची लागवड मोठ्या प्रमाणात होते मात्र पिकाची एकरी उत्पादकता कमी आहे.

विशेष म्हणजे कापसाच्या पिकासाठी अधिकचे शेतमजूर लागत आहे, कृषी निविष्ठांच्या किमती सातत्याने वाढत असल्याने या पिकासाठी अधिकचा उत्पादन खर्च करावा लागत आहे. अशा परिस्थितीत हे पीक शेतकऱ्यांसाठी डोईजड ठरू लागले आहे. प्रामुख्याने कोरडवाहू भागातील शेतकऱ्यांना कापसाचे पीक आता परवडत नसल्याचे पाहायला मिळत आहे.

हेच कारण आहे की, आता परभणी कृषी विद्यापीठाने कोरडवाहू भागातील शेतकऱ्यांसाठी कापसाच्या तीन नवीन जाती विकसित केल्या आहेत. कोरडवाहू भागासाठी विकसित झालेल्या या नवीन जाती दुष्काळी परिस्थितीतही बऱ्यापैकी उत्पादन देतील असा अंदाज आहे. परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठअंतर्गत येणाऱ्या नांदेड येथील कापूस संशोधन केंद्रात या तीन नवीन जाती विकसित झाल्या आहेत.

यासाठी शास्त्रज्ञांनी तब्बल आठ वर्षे मेहनत घेतली आहे. या मेहनतीनंतर कापसाच्या या नवीन जाती केंद्रीय वानप्रसारान समितीने लागवडीसाठी शिफारशीत केले आहेत. कापसाच्या या तिन्ही जातीची मध्य भारतात लागवडीसाठी शिफारस करण्यात आली आहे. यामुळे विद्यापीठाच्या माध्यमातून नव्याने विकसित झालेल्या या तिन्ही जाती शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. N.H. 1901, N.H. 1902 आणि N.H. 1904 या कापसाच्या जाती नव्याने विकसित झाल्या आहेत.

विशेष म्हणजे या नव्याने लागवडीसाठी शिफारशीत करण्यात आलेल्या जाती सरळ आहेत. म्हणजेच या जातीपासून मिळालेली सरकी पुढील वर्षी बियाणे म्हणून वापरली जाऊ शकते. कापसाचे हे वाण मध्यम धाग्याचे आहे. या जातीपासून जवळपास 16 ते 18 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळवता येऊ शकते.

आपल्या महाराष्ट्रासह गुजरात आणि मध्यप्रदेश राज्यातही कापसाचे हे वाण लागवडीसाठी वापरले जाऊ शकते. निश्चितच नव्याने विकसित झालेल्या कापसाच्या या जातीपासून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा