Maharashtra New Expressway : महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमध्ये विविध महामार्गाची कामे पूर्ण झाली आहेत. तसेच, अजूनही अनेक महामार्गाची कामे सुरु आहेत. तसेच काही महामार्ग प्रस्तावित असून येत्या काही दिवसांमध्ये सदर महामार्गाच्या कामाला सुरुवात होणार आहे.
सध्या समृद्धी महामार्गाचे काम युद्ध पातळीवर सुरू असून जुलै 2024 पर्यंत समृद्धी महामार्ग पूर्णपणे बांधून रेडी होईल आणि हा संपूर्ण मार्ग प्रवाशांसाठी खुला होईल अशी आशा आहे. समृद्धी महामार्गाचे आत्तापर्यंत 625 किलोमीटर लांबीचे काम पूर्ण झाले आहे.
नागपूर ते इगतपुरी पर्यंतचे काम पूर्ण झाले असून यावर वाहतूक देशील सुरू झाली आहे. इगतपुरी ते आमने या शेवटच्या 76 किलोमीटर लांबीच्या टप्प्याचे काम सध्या सुरू आहे. हे काम जुलै २०२४ पर्यंत पूर्ण होईल आणि त्यानंतर नागपूर ते मुंबई हा संपूर्ण समृद्धी महामार्ग सुरू होणार आहे.
दरम्यान, समृद्धी महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले असल्याने आता समृद्धी महामार्गाचा विस्तार होणार आहे. समृद्धी महामार्गाच्या विस्तारीकरण प्रकल्पा अंतर्गत एकूण तीन नवीन महामार्ग तयार होणार आहे. हे तिन्ही महामार्ग प्रवेश नियंत्रित राहणार असून याच महामार्गासंदर्भात आता महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे. या महामार्गाच्या कामासाठी एमएसआरडीसी ने अर्थातच राज्य रस्ते विकास महामंडळाने निविदा मागवल्या होत्या. यानुसार इच्छुक कंपन्यांनी निविदा सादर केल्या आहेत.
नागपूर-चंद्रपूर महामार्ग, भंडारा-गडचिरोली महामार्ग, नागपूर-गोंदिया महामार्ग या तीन प्रकल्पांच्या एकूण 11 टप्प्यांसाठी निविदा मागवल्या गेल्या होत्या. या 11 टप्प्यांसाठी इच्छुक कंपन्यांनी 46 निविदा सादर केल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार येत्या 10-15 दिवसांत या इच्छुक कंपन्यांनी सादर केलेल्या आर्थिक निविदा खुल्या केल्या जाणार आहेत. मग त्यानंतर निविदा अंतिम केल्या जातील अन या चालू वर्षातच तिन्ही महामार्गांच्या कामाला सुरुवात केली जाईल.
राज्य रस्ते विकास महामंडळाने तसेच काहीसे नियोजन केले आहे. राज्य रस्ते विकास महामंडळातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, १९४ किमीच्या नागपूर – चंद्रपूर महामार्गासाठी सहा टप्प्यात २२ निविदा, १४२ किमीच्या भंडारा – गडचिरोली महामार्गाच्या एका टप्प्यासाठी चार निविदा आणि १६२ किमीच्या नागपूर – गोंदिया महामार्गाच्या चार टप्प्यासाठी २० निविदा सादर झाल्या आहेत.
दरम्यान आता या तांत्रिक निविदा लवकरच खुल्या केल्या जातील आणि प्रत्यक्षात या महामार्गाचे काम या 2024 मध्येच सुरू होईल असा विश्वास देखील अधिकाऱ्यांच्या माध्यमातून व्यक्त केला जात आहे.